मुंबई : विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आता लवकरच सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. मग प्रचार दौरे सुरू होतील. अशातच सर्वांचं लक्ष लागलं आहे ते ठाकरे घराण्याकडं. ठाकरे घराण्यात उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांच्यापर्यंत कोणी निवडणूक लढवली नाही. मात्र, आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत ठाकरे घराण्याची ही प्रथम मोडीत काढली. आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित ठाकरे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात ? :मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अमित ठाकरे यांनी मुंबईतील एखादा मतदारसंघ निवडून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, अशी गळ सध्या त्यांना कार्यकर्त्यांकडून घालण्यात येत आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देत राज ठाकरे यांनी देखील अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं ठरवलं. अमित ठाकरे यांनी मुंबईतील नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी मतदारसंघांची चाचणी सुरू असल्याचं समोर येत आहे. एका बाजुला मनसेनं वरळी विधानसभा मतदारसंघाला प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनवलं आहे. तिथं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
संपादित छायाचित्र (ETV Bharat) वरळी विधानसभा मतदारसंघात दोन भावांमध्ये लढत ? :निवडणुका जाहीर होण्यापूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघात दोन भावांमध्ये लढत होईल असं बोललं जात होतं. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता इथं संदीप देशपांडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे वरळी वगळता अमित ठाकरे यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी विविध मतदार संघाची चाचणी सुरू आहे. यामध्ये भांडुप, माहीम आणि मागाठणे या तीन विधानसभा मतदारसंघांची सध्या मनसे नेत्यांकडून चाचणी सुरू आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला आव्हान :एका बाजुला राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तर, दुसरीकडं अमित ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. अमित ठाकरे माहीम, भांडुप, मागाठणे पैकी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास हा महायुतीला मोठा धक्का असेल. भांडुप, मागाठाणे आणि माहीम या तीन मतदारसंघांपैकी माहीम विधानसभा मतदारसंघावर राज ठाकरे शिक्कामोर्तब करण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे. अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास हा शिंदे गटाला मोठा धक्का असेल. सध्या माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर हे शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत. या दोघांमध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली असता, "अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याबाबत अद्याप निर्णय झाला नाही," अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ETV भारतला दिली आहे.
हेही वाचा :
- 'राजपुत्र' विधानसभेच्या रिंगणात? अंतिम निर्णयाची प्रतीक्षा - AMIT THACKERAY
- वंसत मोरे सोशल मीडियाच्या आहारी, ठाकरे पुत्रानं घेतला मोरेंचा समाचार - Lok Sabha Elections 2024
- अमित ठाकरे दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात? ठाकरे कुटुंबीयांसाठी अस्तित्वाची लढाई - Lok Sabha Elections