मुंबई Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेटची 22 सप्टेंबर (Senate Election) रोजी नियोजित निवडणूक होणार होती. मात्र, ही निवडणूक आता राज्य सरकारनं रद्द केली आहे. मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रद्द केल्यानंतर यावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दोनवेळा सिनेटची निवडणूक रद्द:मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक तोंडावर आली असताना आणि दोन दिवसावर निवडणूक येऊन ठेपली असताना, अचानक निवडणूक रद्दचा निर्णय कसा काय होऊ शकतो? यावर शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील तीन वर्षात दोनवेळा सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळं यावर शिवसेना (ठाकरे) गटानं कडाडून टीका केलीय.
भीतीमुळं निवडणूक रद्द :शिंदे गट आणि भाजपाला आपला पराभव समोर दिसत असल्यामुळच त्यांनी ही निवडणूक रद्द केलीय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई विद्यापीठ सिनेटमध्ये आपला जर पराभव झाला तर त्याचा मेसेज वेगळा जाईल आणि आपला पराभव होईल, या भीतीनं भाजपा आणि शिंदे गटानं ही निवडणूक रद्द केली असल्याचा गंभीर आरोप, शिवसेना (ठाकरे) युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केलाय.
अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक : दुसरीकडं मुंबई विद्यापीठात सध्या प्रशासक आहे. त्यामुळं प्रशासकावर कोणताच वचक राहिला नाही. प्रशासक मनमानी कारभार करत आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केलाय. त्यामुळं येथे लवकरात लवकर निवडणूक होणं अपेक्षित होतं. मात्र, ही नियोजित निवडणूक रद्द केल्यामुळं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुंबई विद्यापीठ परिसरात आंदोलन केलं. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.