एसीबीच्या चौकशीविषयी आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया रत्नागिरी MLA Rajan Salvi : माझे कुटुंबिय, पक्ष आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनता माझ्यासोबत आहे. हाच माझा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली. रत्नागिरी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात दोन तास चौकशी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (ACB Office Ratnagiri)
चौकशीला नेहमीच सहकार्य केले :ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुढे म्हणाले, गेल्या वर्षभर चौकशी सुरूच आहे. अलिबागमध्ये आतापर्यंत सहा वेळा गेलो. त्यानंतर अधिकारी घरी आले. रत्नागिरीतील सर्व असलेली मालमत्ता त्यांनी तपासली. त्यानंतर त्यांनी माझ्यासह पत्नी, मुला विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर माझे ज्येष्ठ बंधू दीपक साळवी यांच्या बाबतीमध्ये त्यांनी मला एक नोटीस दिली. त्यानुसार आम्ही चौकशीला सामोरे गेलो. दोन तास चौकशी झाली. काही जुने प्रश्न त्यांनी पुन्हा विचारले. काही नवीन प्रश्न विचारले. त्यांची उत्तरे आम्ही त्यांना दिली. चौकशीला आम्ही नेहमीच सहकार्य करत आलो आहोत. यापुढेही करत राहणार आहो.
मला कुटुंबाची साथ :आमचे एकत्र कुटुंब आहे. मी राजकारणामध्ये गेल्या ४० वर्षांपासून आहे. पण, माझे मोठे बंधू म्हणून दीपक साळवी यांनी व्यवसायाच्या माध्यमातून मला आतापर्यंत मदत केली आहे. त्यांच्यामुळेच मी आज राजकारणात उभा आहे. म्हणून त्यांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या मागे शुक्लकाष्ट लावायचं हा एसीबीचा हेतू असू शकेल. मात्र, माझे कुटुंबीय कायम माझ्यासोबत असल्याचं आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांची मोठी गर्दी :आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या ज्येष्ठ बंधूना आज चौकशीसाठी बोलविण्यात आल्यानं लांजा, राजापूर, रत्नागिरीसह चिपळूण, खेड येथील शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये महिला शिवसैनिकांची संख्या अधिक होती. उपविभागिय अधिकारी विनित चौधरी यांच्या सह पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले होते. तर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, संजय साळवी, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- आजचा दिवस ऐतिहासिक, 'याची डोळा याची देह' हा क्षण बघायला मिळणं म्हणजे श्रीरामाचा आशीर्वाद आहे- देवेंद्र फडणवीस
- शिवसेना आमदार अपात्र निकाल पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
- सोलापूरच्या चित्रकाराची अनोखी रामभक्ती; रक्ताने साकारली प्रभू श्री रामांची प्रतिमा