अहमदनगर (शिर्डी) :2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ अशा बाता मारल्या. नंतर त्यांनीच हा चुनावी जुमला असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. आता 2024 लोकसभा निवडणुकीत मोदी गॅरंटी नावाने 2014 चा जुमला खेळला जात आहे; मात्र या जुमला गॅरंटीवर जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याचा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज (19 एप्रिल) शिर्डीत केला.
भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल :आज शुक्रवारी शिर्डी अनुसूचित जाती राखीव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करतेवेळी आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख उपस्थित होते.
हा सर्व चुनावी जुमला :उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. भाजपाने 2014 ला अनेक आश्वासने दिली. हा सर्व चुनावी जुमला असल्याचं दिसून आलं. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, नोटाबंदी केली यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. देशातील अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांचे रोजगार गेले. एकूणच गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाची अर्थव्यवस्था बिघडवून टाकली आहे. युवकांना रोजगार नाही. महिला सुरक्षित नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, उद्योजक अडचणीत आहेत; मात्र यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.