कोल्हापूर MLA Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी गजापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. "नुकसानग्रस्त लोकांना दररोज 1 हजार रुपये भरपाई द्यावी. राज्य सरकारनं या ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करावेत," अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडं केली.
शरद पवार, उद्धव ठाकरे गप्प का? :"शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावात 14 जुलै रोजी हिंसाचार झाला. या घटनेला महिना होत आला तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे विशाळगडाजवळील गजापूर गावात झालेल्या हिंसाचार प्रकरणी गप्प का?" असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला. "हिंसाचार प्रकरणी संशयित आरोपींवर दहशतवाद विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा. तसेच पोलीस अधीक्षकांना तत्काळ बडतर्फ करा," अशी मागणी अबू आझमी यांनी केली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह :"विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाची चौकशी व्हावी, तसेच अजूनही यातील काही संशयित आरोपी मोकाट आहेत, यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 12 ऑगस्टला शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांची सभा होणार असून त्यांना रोखलं पाहिजं," असं आवाहन त्यांनी केलं. "गजापूर येथील नुकसानग्रस्त लोकांना दररोज 1 हजार रुपये भरपाई द्यावी, येथील जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं या ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करावे," अशी मागणी अबू आझमी यांनी केली.