नाशिक Minor Girl Suicide Nashik : देशात सध्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. कोलकाता, बदलापूर प्रकरणानंतर देशभरातून अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान, नाशिकमधून धक्कादायक घटना उघडकीस आली. नाशिकच्या देवळाली गावात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपलं जीवन संपवलंय. एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून मुलीनं आत्महत्या केली. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणासह त्याच्या कुटुंबातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
नेमकं प्रकरण काय? : नाशिकच्या देवळाली गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती. रस्त्यानं येता-जाता संशयित आरोपी कलाम मन्सूरी सय्यद हा गेल्या दोन वर्षापासून तिचा मानसिक छळ करत लग्न करण्याचा तगादा लावत होता. कलाम सय्यदच्या कुटुंबातील काही लोकदेखील लग्न करण्यासाठी या मुलीकडं तगादा लावत होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुख्य संशयित कलाम सय्यद याच्यासह आई नाना खाला, मुन्ना शेख, बबलू शेख, जहांगीर शेख, लादेन मन्सुरी, अंजुम सय्यद, मंसूरी शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलीच्या आईची तक्रार : "संशयित जहांगीर शेख, बबलू शेख व मुन्ना शेख हे नेहमी आपल्या मुलीला कलाम मन्सुरी सय्यदसोबत लग्न केलं नाहीस, तर आम्ही तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, असा दम देत होते. या सर्वांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला म्हणून तिनं आत्महत्या केली," असा आरोप पीडित मृत अल्पवयीन मुलीच्या आईनं केला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर रिपोर्ट राखून ठेवण्यात आला.