मुंबईAI Technology : पुण्यात विशाल अग्रवाल या अल्पवयीन आरोपीनं पबमध्ये मद्यपान करून सुसाट गाडी चालवताना दोघांचा बळी घेतला. यानंतर पुण्यातील अवैध पब, बार आणि दारू दुकानांचा प्रश्न चर्चेत आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेते सुषमा अंधारे यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक देत आंदोलन केलं. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे कसे हप्ते वसुली करतात, याची यादीच वाचून दाखवली. यावेळी त्यांनी काही आरोपही केले. दरम्यान, या सर्व आरोपांचं खंडन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलय. तसंच हे सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यादी स्वतःच्या पत्रावर लिहून द्यावी :पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, ज्या लोकप्रतिनिधींनी राज्य उत्पादन शुल्कात वसुली चालते आणि अधिकारी हप्ते घेतात असे आरोप केलेत, त्याच्यात काही तथ्य नाही. अर्धा टक्का जरी याच्यात खरं असेल तर वरिष्ठ पातळीवर समिती गठीत करून याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यांनी दिलेली यादी कोणीही साध्या पेपरवर लिहून देऊ शकते. त्याच्यात काही अर्थ नाही; परंतु लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पत्रावर लेटरहेडवर ही यादी लिहून द्यावी, असं आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना दिलं.
AI चा प्रस्ताव आणणार :राज्य उत्पादन शुल्क यांनी मागील काही दिवसात देशी दारूची दुकानं, दारूची दुकानं, वाईन शॉप आणि पब यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मागील दोन वर्षांत वाढ झाली आहे. एकीकडे आरोप जे करतात त्यांनी जे अवैध दारूचे धंदे, पब आणि बार सुरू आहेत त्यांच्यावर झालेली कारवाई यांच्याकडे पण लक्ष द्यावे, असा टोला विरोधकांना लगावला. तसंच जी ठराविक वेळ आखून दिली आहे त्या वेळेतच दारूची दुकानं, बार किंवा पब चालू ठेवण्याची नियमावली आहे; परंतु काही चालक-मालक हे वेळ पाळत नाहीत. यावर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग कडक कारवाई करणार असून, AI चा प्रस्ताव विभागाने मांडला आहे. याचं कालच प्रेझेंटेशन झालं आहे आणि लोकसभा निवडणुकीचा 4 जूनला निकाल लागल्यानंतर हा प्रस्ताव अंमलात येईल, असे शंभूराज देसाई म्हणाले.