मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रतिक्रिया दिली. "माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही आतापर्यंत केली नाही. मी राजीनामा द्यावा की नाही द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही, याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील," अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
'ऑफिस ऑफ प्रॉफिट'चा मुद्दा नाही :"राखेबाबत सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी निर्णय दिलाय. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये तयार होणाऱया राखेचा कचरा स्वत: खर्च करुन उचलावा, असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत सरकारशी त्याचा थेट संबंध नाही, त्यामुळं याबाबत 'ऑफिस ऑफ प्रॉफिट'चा मुद्दा येत नाही," असं स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे यांनी होत असलेल्या आरोपांवर दिलं.
आमदार संदीप क्षीरसागर यांचे आरोपींसोबत संबंध : "आमदार संदीप क्षीरसागर यांचे व आरोपींचे कुठेतरी संबंध असावेत, अन्यथा जी माहिती पोलिसांना मिळत नाही ती माहिती त्यांना कशी मिळते?" असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.