मुंबई Damodar Theater Mumbai :'दामोदर नाट्यगृह' 10 वर्षे बंद राहिले तर गिरणगावातील मराठी नाट्य रसिक, रंगकर्मीनी जायचं कुठं? असा सवाल नाटयकलावंताच्या मनात निर्माण झाला होता. त्यामुळं त्याचठिकाणी किमान 1000 आसनव्यवस्थेसह दामोदर नाट्यगृहाला पूर्वीप्रमाणेच जागा आणि शाळेच्या गरजेनुसार फेज मॅनरमध्ये शाळेचं बांधकाम उभं करण्यासाठी योग्य तो सुधारित आराखडा तयार करावा, असे आदेश दीपक केसरकर यांनी सोशल सर्विस लीग आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वेळ पडल्यास तज्ञ आर्किटेक्टची मदत घ्या. शाळेची आताची इमारत कमकुवत वाटल्यास त्याचं रिस्टोरेशन करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल याबाबतच्या सुचनाही दिल्यात.
तात्पुरती व्यवस्था करा : गरज भासल्यास महापालिकेकडं त्या परिसरात कोणती इमारत असेल तर तात्पुरती शाळेसाठी उपलब्ध करून द्या. पण नाट्यगृह आणि शाळा ही दोन्ही बांधकामे एकाच वेळी झाली पाहिजेत, असे निर्देश केसरकरांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिलेत. मागील काही महिन्यांपासून परळ येथील दामोदर नाट्यगृहाचं तोडकाम थांबवण्याचं आदेश संबंधित पालिका तसेच राज्य प्रशासनाने दिले होते. नाट्यगृहाच्या जागी वाढीव क्षमतेचं नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळाला त्यात पूर्वीप्रमाणेच जागा अशा वादात सोशल सर्व्हिस लीग आणि सहकारी मनोरंजन मंडळ यानिमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. 'दामोदर नाट्यगृह' आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान नाकारता येणार नाही. गिरणगावचा हा सांस्कृतिक वारसा जतन केला गेला पाहिजे. दामोदर नाट्यगृह त्याच जोमाने त्याहीपेक्षा अधिक क्षमतेचे त्याच जागी उभारण्यात येईल, त्यात सहकारी मनोरंजन मंडळालाही पूर्वीप्रमाणे किंबहुना वाढीव जागा देण्यात येईल, असा विश्वास केसरकर यांनी सहकारी मनोरंजन मंडळ आणि नाट्यकर्मीना दिला आहे.
शाळा आणि नाट्यगृहांचे बांधकाम एकाचवेळी सुरू : शाळा आणि नाट्यगृहांचं बांधकाम एकाचवेळी सुरू करण्यात यावं आणि दोन वर्षांत सदर बांधकाम पूर्ण करावं. नाट्यगृहाचा आराखडा बनवताना नाट्यकर्मी आणि तज्ञ आर्किटेक्ट यांची एक समिती नेमली जाईल आणि त्यांच्या सूचनांना अनुरूप नाट्यगृहाचा आराखडा तयार करण्यात येईल, जेणेकरून नवीन नाट्यगृहात काही त्रुटी राहणार नाहीत. तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुंगनटीवार यांच्याशी चर्चा करून सहकारी मनोरंजन मंडळाचं बंद झालेलं अनुदान पुन्हा सुरू करून देण्याचं आश्वासनही केसरकर यांनी यावेळी दिलं.
दामोदर नाटयगृहाचे पाडकाम : गिरणगावातील कामगार, लोककलावंतांची हक्काची रंगभूमी असणाऱ्या दामोदर नाटयगृहाचं पाडकाम १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालं. या संदर्भात सहकारी मनोरंजन मंडळाचे सदस्य श्रीधर चौगुले म्हणाले की, सोशल सर्व्हिस लीग संस्थेनं ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन महिन्यांचा पगार देऊन नाट्यगृह कर्मचाऱ्यांना कायमच घरी बसवलं होतं. तर सन १९२२ साली ना.म. जोशींनी स्थापन केलेल्या गिरणगावातील 'दामोदर नाट्यगृह' आणि सहकारी मनोरंजन मंडळाने २०२२ मध्ये १०० वर्षे पूर्ण केली.