महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छगन भुजबळांच्या 'त्या' राजकीय वक्तव्याने खळबळ, राज्यघटना न बदलण्याचाही दिला शब्द - Minister Chhagan Bhujbal - MINISTER CHHAGAN BHUJBAL

Minister Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळत आहे, असं खळबळजनक वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुजबळांचं हे वक्तव्य महायुतीसाठी घातक ठरू शकतं. तर दुसरीकडे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असंही सांगण्यात येतय.

Minister Chhagan Bhujbal
छगन भुजबळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 7:59 PM IST

Updated : Apr 29, 2024, 8:11 PM IST

छगन भुजबळांच्या वक्तव्याविषयी मत मांडताना अ‍ॅडवोकेट वैजनाथ वाघमारे

मुंबईMinister Chhagan Bhujbal :शरद पवार तसंच उद्धव ठाकरे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किती नुकसान करू शकतात, असा प्रश्न भुजबळ यांना एका खासगी वृत वहिनीच्या पत्रकाराने विचारल्यानंतर ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना जो काही प्रतिसाद मिळत आहे त्यावरून त्यांना मिळणारी सहानुभूती दिसून येते. पक्ष फुटल्यामुळे या दोघांबरोबर सहानुभूतीची लाट आहे. पण असं असलं तरी लोकांचा विश्वास मोदींवर आहे आणि मोदी सरकार बनवतील असंही भुजबळ म्हणाले. तसंच राहुल गांधी सांगत आहेत की, एनडीएला बहुमत मिळालं तर देशातील संविधान बदललं जाईल. तसंच आमचं सरकार आल्यानंतर राज्यघटना बदलली जाणार असं विधान कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केलं होतं. विरोधकांनीसुद्धा याच विधानाला हाताशी धरून "अबकी बार, ४०० पार" हा भाजपाचा नारा फक्त राज्यघटना बदलण्यासाठीच आहे, असा प्रचार सुरू केला आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, विरोधकांचा याबद्दल जो काही प्रचार सुरू आहे तो जोरात आहे. लोकांनासुद्धा असं वाटतं की मोदी ४०० पार जे बोलत आहेत ते संविधान बदलण्यासाठी आहे. परंतु मोदीजी वारंवार सांगत आहेत की, आता खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा संविधान बदलू शकत नाहीत.

परिणाम मतपेट्यांमध्ये दिसतील :छगन भुजबळ पुढे म्हणाले की, विरोधकांकडून संविधान बदलण्याबाबतचा खोटा प्रचार लोकांमध्ये सुरू आहे. याचा किती परिणाम होईल हे मतपेट्या उघडल्यानंतरच समजेल. बारामती मधील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबातील लढती विषयी बोलताना भुजबळ म्हणाले की, ही त्यांच्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे. एका कुटुंबामध्ये इतकी वर्ष राहिल्यानंतर हे जे काही सुरू झालं आहे ते त्यांना आणि लोकांनाही योग्य वाटत नाही. यामध्ये कोणाची चूक आहे, तो भाग निराळा आहे; परंतु हे झालं नसतं तर बरं झालं असतं अशी भावनिक प्रतिक्रियासुद्धा भुजबळ यांनी दिलीय.

छगन भुजबळ नाशिक पुरतं बोलले असतील :छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं आहे, तशी परिस्थिती सध्या नाही. ते कदाचित त्यांच्या नाशिक मतदारसंघापुरतं बोलत असतील, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी दिली आहे. वाघमारे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तसंच अजित पवार यांच्या पक्षाचं, संघटनेचं, कार्यकर्त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे. राज्यात अनेक जाती, जमाती ज्या वंचित राहिल्या होत्या त्यांच्यापर्यंत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पोहचला आहे. महायुतीचे जे उमेदवार लोकसभेसाठी उभे आहेत ते प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत. ग्रामीण भागामध्येसुद्धा महायुतीचे नेते, कार्यकर्ते, प्रचंड प्रमाणामध्ये काम करत आहेत. म्हणून येणाऱ्या दिवसात महायुती चमत्कार घडविल्याशिवाय राहणार नाही. विरोधक अजून २५ वर्षे तरी सत्तेमध्ये येऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिव्या देण्याशिवाय कुठलंही काम उरलं नाही. कामातून सहानुभूती मिळवा. आता हा नवीन महाराष्ट्र आहे. नवीन संकल्पनेचा नवीन राजकीय समीकरणे बांधणारा हा महाराष्ट्र आहे. म्हणून नवीन महाराष्ट्रामध्ये नवीन संकल्पनेतून राजकीय समीकरणं जेव्हा निर्माण होतात तेव्हा काम करणाऱ्या माणसाला जनता डोक्यावर घेते. याकरता महायुतीमध्ये भाजपाचं काम आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं काम आहे. या संघटना प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहेत. म्हणून छगन भुजबळ यांच्या विचारांशी मी सहमत नाही, असंही वाघमारे म्हणाले.

भुजबळांचं वक्तव्य वास्तववादी :भुजबळ यांनी केलेल्या सहानुभूतीच्या वक्तव्याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, छगन भुजबळांनी या घडीला केलेलं वक्तव्य हे सत्यावर आधारित आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षफुटीनंतर मोठे नेते जरी वेगळे झाले असले तरीसुद्धा कार्यकर्ते अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या मूळ पक्षासोबत आहेत. आताच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या पद्धतीची वागणूक भाजपाकडून शिवसेना एकनाथ शिंदे गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिली जात आहे, यावरून कार्यकर्तेच नाही तर नेते सुद्धा नाराज आहेत. परंतु हे सर्व मूग गिळून गप्प आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या दोन मतदानाच्या टप्प्यात राज्यात महाविकास आघाडीचा जोर दिसून आल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या कारणाने महायुतीचे नेते धास्तावले आहेत. म्हणूनच छगन भुजबळ यांचं वक्तव्य वास्तववादी असून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्न महायुतीचे नेते जरी करत असतील तरी वस्तुस्थिती कोण बदलू शकणार नाही. याचं उत्तर ४ जूनला निकालाच्या दिवशी दिसून येईल असंही जयंत माईणकर म्हणाले.

हेही वाचा :

  1. महायुतीत जागावाटपाचं गणित बिघडलं, सहा जागांचा घोळ कायम; भाजपा शिवसेनेत रस्सीखेच - Lok Sabha Election 2024
  2. मुंबईतील अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्यांचा बंदोबस्त करणार; 'त्या' घटनेनंतर पालकमंत्री लोढा आक्रमक - Mumbai Crime
  3. कलंकित काँग्रेस सत्ता हिसकावण्याचे स्वप्न पाहत आहे, पण इंडिया आघाडी दोन टप्प्यातच पराभूत : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Lok Sabha Election 2024
Last Updated : Apr 29, 2024, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details