मुंबई Microsoft Outage Sparks : मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्विस डाऊन झाल्यामुळं देशातील सगळ्याच सेक्टरला फटका बसलेला आहे. विमान सेवा सुरळीत चालवण्याबाबत डीजीसीए आणि इतर यंत्रणा यावर काम करत आहेत. प्रवाशांना पुरेशा सुविधा पुरवण्याच्या विमान कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले मोहोळ? :मुंबईत बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, "स्पाइस जेट, इंडिगो आणि काही विमानसेवांमध्ये अडचणी येत आहेत. मात्र, प्रवाशांना योग्य ती सुविधा पुरवण्यात यावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या विमान वाहतुकीच्या नवीन बुकिंग होत नाहीत. काही अडचणी येत आहेत. हा तांत्रिक बिघाड आहे की सायबर हल्ला आहे याबाबत अद्याप काही अधिकृत मांडण्यात आलेलं नाही. पण आमच्या यंत्रणा यावर काम करत आहेत."
केंद्र सरकार मार्ग काढेल : "सॉफ्टवेअर डाऊन झाल्यामुळं ही समस्या उद्भवली आहे. त्याचा फटका विमानसेवेवर झाला आहे. मात्र, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत असून लवकरच त्यावर मार्ग निघेल," असं मोहोळ म्हणाले. हवाई वाहतूक मंत्रालय, डीजीसीए एकत्रितपणे ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असून, सध्याच्या परिस्थितीवर समन्वय साधून नियंत्रण मिळवण्यात येत असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.