मुंबई - Monsoon in Mumbai : मुंबईकरांना आता अवघे काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, महानगरात तुरळक पावसाची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पावसासाठी मुंबईकरांना वीस तारखेपर्यंत वाट पहावी लागणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या मते, 20 जूनपासून मुंबईत मान्सून सक्रिय होऊ शकतो. मुंबईत सध्या तुरळक पाऊस सुरू आहे. सध्या काही भागात पाऊस पडतो, तर काही भागात पडत नाही अशी मुंबईत स्थिती आहे. पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आधीच गर्मी आणि उकाड्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हैराण आहे. त्यातच पाऊस लांबच चालल्याने शेतकरी देखील चिंतेत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जूनमध्ये एकट्या मुंबई शहरात साधारणपणे 500 मिमी पाऊस होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत मुंबई शहरात 198 मिमी तर उपनगरात 128 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे विदर्भात पाहिलं असता जून महिन्याचे तीन आठवडे उलटून गेले तरी अद्यापही विदर्भात पावसानं दमदार सुरुवात केलेली नाही. मान्सूनचं आगमन लांबल्यानं विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हलक्या पावसाच्या आगमनानंतर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांची पेरणी केली, तर अनेक शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजननं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची शक्यता नाही. या भागात पुढील 24 तासांसाठी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस झाल्यास तो हलका ते मध्यम स्वरूपाचा होईल. पालघर, ठाणे या भागांना भारतीय हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिला असून, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला भारतीय हवामान विभागानं दिलेला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून, या भागात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आल्या आहे.