छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange On Obc Protest : वडीगोद्री इथं ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र, हे आंदोलन कशासाठी हे सांगावं, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली. "सदरील आंदोलन पूर्णतः मॅनेज असून आपण एकत्र बसून चर्चा करायला तयार आहोत. आज छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांना एकत्र आणलं, हे आमच्यासाठी बर झालं, आता मराठे एकत्र येतील. आमच्या नोंदी रद्द केल्या तर ओबीसी यांना दिलेलं वरचं आरक्षण देखील तपासावं लागेल," असा इशारा मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आम्ही चर्चेला तयार :"वडीगोद्री इथं ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केलं आहे. आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला तयार आहोत. एकत्र बसून तोडगा निघत असेल, तर तो आम्ही काढू. मात्र, आता सुरू असलेलं आंदोलन संपूर्णतः मॅनेज आहे. सरकारमधल्या काही मंत्र्यांनी मुद्दाम हे आंदोलन सुरू करायला लावलं. ग्रामीण भागात ओबीसी समाज गुण्यागोविंदानं राहतो. मात्र, त्यात आता भांडण लावण्याचा प्रकार सुरू झालाय," असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. "आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या पूर्णतः कायदेशीर नोंदी आहेत. मराठा हाच कुणबी आहे हे देखील गॅझेटमध्ये नमूद आहे. त्यामुळे आम्हाला खोटं म्हणणं साफ चुकीचं आहे. १४ टक्के आरक्षणाची चौकशी करुन वरचे १६ टक्के काढून टाकावं लागेल. ओबीसीला फक्त १४ टक्के आरक्षण होतं, मग वरचं १६ टक्के कसं दिलं. त्यावेळेस जनगणना झाली असेल आणि कायदा असेल, तर त्यांचं सुद्धा रद्द व्हायला हवं. छगन भुजबळ काहीही म्हणतो. त्यांनी सर्व जाती एकमेकांच्या अंगावर घातल्या," असा घनाघाती आरोपी त्यांनी केला आहे.
आम्हाला विरोध म्हणून आंदोलन: "ओबीसी आंदोलक म्हणतात, आम्ही मराठा समाजाचा आदर करतो, मात्र हे आता आदर करायला लागले. मी दहा महिन्यापासून आदर करतोय. ओबीसी उपोषणाच्या मागण्या नाहीत, फक्त आम्हाला विरोध सुरू आहे. आमच्या नोंदी रद्द करा म्हणजे हा विदूषकपणा आहे. मराठा विरोधी सरकार आणि ओबीसी नेत्यांची ही बैठक होती. मराठा द्वेशापोटी यांनी आंदोलन सुरू केलं. आम्हाला नोंदी सापडून आरक्षण नाही, तर मग आमचं घरदार शेती पण घेतो का म्हणा," असा टोला छगन भुजबळ यांना जरांगे यांनी लगावला. "त्यांची मागणी काहीच नाही, फक्त आम्हाला विरोध करण्यासाठी टोळी जमली आहे. मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत. आमची गरज आहे, ज्यांच्याकडं पुरावा आहे. मात्र, विरोध करणाऱ्यांकडं तर पुरावे पण नाहीत. याचा अर्थ असा आहे की आम्ही यांच्यात जात नाही, ते आमच्यात आले आहेत."