जालना Maratha Agitation: संपूर्ण राज्यभरात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील वेळोवेळी आंदोलन आणि उपोषण करत आहेत. पण याचा काही फायदा झाला नसल्याचा आंदोलकांचा दावा आहे. 27 जानेवारीला वाशी येथे आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आदेश दिले आणि अध्यादेशही काढला. पण लाखो मराठ्यांना घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारच्या जाळ्यात अडकले. हा फक्त जरांगे यांनी मुंबईत येऊ नये यासाठी आखलेला प्लान होता, अशी मराठा समाज बांधवांमध्ये भावना आहे. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर 10 फेब्रुवारीला अंतरवली सराती येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकारण तापलयं.
जरांगे पाटलांनी उपचार नाकारले: सकल महाराष्ट्र समाजानं बुधवारी महाराष्ट्र बंदचे सोशल मीडियातून आवाहन केले. आज (15 फेब्रुवारी) जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार नाकारले. त्यांनी सरकार विरोधात जोरदार टीका केली. या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मराठा समाजाकडून जोरदार टीका केली जात आहे. जरांगे पाटलांची तब्येत पुन्हा खालावल्यानं राज्यातील मराठा रणरागिणी भगिनींनी आक्रमक भूमिका घेत सरकारला बांगड्या भेट देणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र, सरकारनं सध्या तरी तोंडावर बोट आणि हाताची घडी अशीच भूमिका घेतली आहे.