नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वक्तव्याविरोधात आज विरोधकांनी संसदेच्या परिसरात मोठं आंदोलन केलं. मात्र या आंदोलनात काँग्रेस खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का मारल्याचा आरोप भाजपाच्या खासदारांनी केला. या धक्क्यामुळे खाली पडलेले दोन खासदार जखमी झाले आहेत. या जखमी खासदारांमध्ये भाजपाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्कामुळे दोन खासदार जखमी ? : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह विधानावर विरोधकांनी आंदोलन केलं. या आंदोलनात राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्क्यामुळे भाजपाचे दोन खासदार जखमी झाल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे. याबाबत बोलताना भाजपाचे जखमी खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी सांगितलं, की मी पायऱ्यांजवळ उभा होता, यावेळी राहुल गांधी आले. यावेळी राहुल गांधी यांनी माझ्याजवळील खासदारांना धक्का दिला. त्यानंतर मी खाली पडलो. माझ्या अंगावर हे खासदार पडले, त्यामुळे मी जखमी झालो, असं त्यांनी सांगितलं. या घटनेत भाजपा खासदार मुकेश राजपूत हे देखील जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आरएमएल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी : भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी खाली पडल्यानं संसदेत जखमी झाले. प्रतापचंद्र सारंगी हे संसद भवनाच्या पायऱ्यांवरून खाली पडले. त्यांना व्हील चेअरमधून बाहेर काढण्यात आलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना धक्काबुक्की केल्यानं ते पडून जखमी झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मी संसदेत शिरण्याचा प्रयत्न करत होतो. यावेळी भाजपा खासदारांनी मला धक्काबुक्की करुन धमक्या दिल्या. या धक्क्याच्या वेळी काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनाही धक्का बसला, असं ते म्हणाले. "संसदेत जाणं हा माझा अधिकार आहे. मला कोणीही रोखू शकत नाही. मला संसदेच्या आत जायचं होतं. मात्र मला थांबवण्यात आलं. भाजपाचे खासदार मला प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रयत्न करत होते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024; बाबासाहेब आंबेडकरांवरील अमित शाहांच्या वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक, लोकसभेत स्थगन प्रस्ताव
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: वन नेशन वन इलेक्शन विधेयक होणार संसदेत सादर; शिवसेना, भाजपाच्या खासदारांना व्हीप जारी
- ... तर सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, नरेंद्र मोदी यांची संविधानावरील चर्चेत काँग्रेसवर सडकून टीका