कोल्हापूर : खुरपी बनवणारं कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे गावही भारताच्या नकाशावर नावारुपास येत आहे. या गावात बनणाऱ्या 7 दर्जेदार खुरप्यांचा महाराष्ट्रासह दक्षिण कर्नाटक आणि उत्तरप्रदेश, बिहारपर्यंत नावलौकिक झाला असून जिल्ह्यातील 'खुरप्यांचं गाव' अशी ओळख या गावाला मिळाली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. वर्षाच्या तिन्ही ऋतूमध्ये 'लाखोंचा पोशिंदा' शेतकरी शिवारात काबाडकष्ट करत असतो. शेतातील कोणतंही काम करताना शेतकऱ्याचा हक्काचा सोबती म्हणून खुरपं असतंच. शिवारातील कोणतंही काम करताना हातात खुरपं घेतलेला शेतकरी सर्रास पाहायला मिळतो.
गेल्या 70 वर्षांपासून व्यवसाय सुरू : कोल्हापूरपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या झाडीत, सभोवताली डोंगर रांगांच्या संरक्षणात वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे गावची लोकसंख्या अवघी 2 हजार 500 आहे. मात्र, या गावातील निम्म्याहून अधिक कुटुंब शेतकऱ्यांना लागणाऱ्या खुरप्यांचा व्यवसाय करतात. गेली 70 वर्ष गावात पारंपरिक पद्धतीनं शेतीच्या मशागतीसाठी लागणारी भांगलणीची खुरपी, गवत कापण्यासाठी लागणारा विळा, ऊस तोडणीसाठीचं खुरपं, परळी, धनगर समाजातील लोकांसाठी आकडी बनवण्याचं काम चार पिढ्यापासून या गावात सुरू आहे. कोल्हापुरातील व्यावसायिकांकडून लोखंडी कमान पाट्यांचा कच्चा माल खरेदी करून मागणीप्रमाणे या पट्ट्या कट केल्या जातात. खुरप्याच्या आकाराप्रमाणे आगीच्या भट्टीत भाजल्यानंतर खुरपी बनवणारे हे कारागीर घनाचे घाव घालून त्याला हवा तो आकार देऊ शकतात.
पूर्वी हातानं चालणाऱ्या भात्यावर लोखंडाला तापवलं जायचं. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रिक भात्यावर या भक्कम लोखंडाला आकार देण्याचं कसब इथल्या 16 कुटुंबातील कारागिरांनी आत्मसात केलंय. या गावातील महादेव लोहार यांच्या कुटुंबातील चौथी पिढी आता हा वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत. महिन्याकाठी 60 ते 70 हजारांचं उत्पादन एक कुटुंब करतं. तर उत्पादन खर्च वजा करता एका कुटुंबाला किमान 30 ते 40 हजारांचा नफा मिळत असल्याचं महादेव लोहार यांनी सांगितलं.
तरुणाई रमली वडिलोपार्जित व्यवसायात : गावातील सुतारवाडीत राहणाऱ्या अनेक तरुणांनी चांगलं शिक्षण घेतलंय. मात्र, शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती नसल्यानं अनेक तरुणांनी याच व्यवसायाचे औद्योगिक प्रशिक्षण घेऊन वडिलोपार्जित व्यवसायात उडी घेतली आहे. महिन्याला आठ ते दहा हजारांची दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा घरचा व्यवसाय सांभाळण्याला इथल्या तरुणांनी प्राधान्य दिलं असल्याचं गावातील युवा उद्योजक स्वप्निल लोहार यानं सांगितलं.
धनगरी आकडी बनवण्यात हातखंडा : कोल्हापूरपासून जवळ असलेल्या सांगली, आटपाडी, सांगोला, माढा, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे. इकडचे अनेक व्यापारी आणि धनगर बांधव गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापुरातील पेंडाखळे गावातून धनगरी आकडी घेण्यासाठी येतात. दर्जेदार आणि टिकाऊ आकडी धनगर बांधवांसाठी शेळ्या मेंढ्यांचा चारा झाडावरून काढण्यासाठी या धनगरी आकडीचा वापर करतात. गावातील दिगंबर लोहार या तरुणाचा धनगरी आकडी बनवण्यात हातखंडा असल्याचं त्यानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
खुरप्यांच्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल : सात प्रकारची दर्जेदार खुरपी बनवण्यात अग्रेसर असलेल्या या गावातील 16 कुटुंबातील पुरुष मंडळीकडं वेगवेगळ्या प्रकारची खुरपी बनवण्याची कला आहे. दिवसाला एका कुटुंबातील तीन सदस्य किमान 150 खुरपी बनवतात. दिवसाला 16 कुटुंबांकडून 2 हजार वेगवेगळ्या खुरप्यांचं उत्पादन होतं. तर यातून महिन्याकाठी एका कुटुंबाला 30 ते 40 हजारांचा निव्वळ नफा मिळत असल्याचं गावातील व्यावसायिक गजानन सुतार यांनी सांगितलं. तर या व्यवसायामुळं गावाचं नाव महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्येही आता प्रसिद्ध झालंय. प्रत्येक खुरप्यावर असणारा 'मुक्काम पोस्ट पेंडाखळे' हा ट्रेडमार्क गावाची नवीन ओळख बनल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितलं.
हेही वाचा -