नागपूर Devendra Fadnavis :आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर (OBC) अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा सांगितलं आहे. त्यामुळं त्यांचीही भूमिका तशाच प्रकारची आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सोमवारी (29 जानेवारी) नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. वेळ पडल्यास आपण मंत्री छगन भुजबळांशी (Minister Chhagan Bhujbal) बोलू, असंही फडणवीस म्हणाले.
ओबीसींवर अन्याय होणार नाही : जोपर्यत भाजपा सरकारमध्ये आहे, तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसींवर (OBC Reservation) अन्याय होऊ देणार नाही. जर अशी वेळ आली की, आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही तेव्हा मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेल, पण काहीही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी अन्याय होऊ देणार नाही, असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलं.
भुजबळ यांच्यासोबत चर्चा करणार : ओबीसींवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, ही भाजपाची भूमिका आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत मी स्वतः चर्चा करणार आहे. जे काही त्यांचे आक्षेप असतील, त्यांनी निश्चित सांगावं. ओबीसींवर कुठेही अन्याय होत असेल तर आपण निश्चितपणे त्यामध्ये परिवर्तन करू, आवश्यक त्या सुधारणा आपण करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता जो घेतलेला निर्णय आहे, तो सरसकट घेतलेला निर्णय नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल असा तो निर्णय आहे, असंही फडणवीस म्हणाले.