जालना Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय. 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी येत्या 20 तारखेपर्यंत करावी, अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे लवकरात लवकर मागं घेण्याची मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा अजूनही विश्वास आहे. त्यामुळं ते याबाबत विशेष अधिवेशनात निर्णय घेतील, अशी अपेक्षाही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
मुंबईला जाऊन फसवणूक झाली का? : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज हा 26 जानेवारीला मुंबईच्या वेशीवर धडकला होता. त्यावेळी 'सगेसोयरे' याबाबत राज्य सरकारनं अधिसूचना काढली होती. त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यामुळं मुंबईला जाऊन मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप झाला होता. यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. "मुंबईला जाऊन मराठा समाजाची फसवणूक झाली नाही. मुंबईला गेल्यानंच सरकारनं अधिसूचना काढली होती. त्यामुळं फसवणूक झाली नाही. फसवणूक झाली ती फक्त अधिसूचनेच्या अंमलबजावणीबाबत. त्यामुळं सरकारनं आता याबाबत 20 तारखेपपर्यंत अंमलबजावणी करावी," अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.
सर्वच मराठा हे कुणबी : कुणबी प्रमाणपत्रावरुन मनोज जरांगे पाटील यांनी काही मुद्दे मांडले आहेत. "राज्यातील सर्वच मराठा हे कुणबी आहेत. कुणबी म्हणजे सर्वच 'शेतकरी' असा त्याचा अर्थ होतो. शेतकरी असा उल्लेख करण्याची जर कोणाला लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्या जमिनी विकून थेट चंद्रावर राहायला जावं," अशी खोचक प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय.