नवी मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेला पायी मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. तत्पूर्वी 25 तारखेला या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठी बांधवांचा शेवटचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. यामुळं नवी मुंबई शहरात अडीच ते तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय. त्याचबरोबर पनवेलच्या हद्दीत आणि एपीएमसी मार्केटमध्ये आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
पनवेल परिसरात दुपारच्या जेवणाची सोय : मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबईमध्ये येत आहे. त्यामुळं रायगडमधील पनवेल शहरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली असून, जेवणाची व्यवस्था केलीय. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांना 40 किलोमीटरपर्यंत खारघर ते कळंबोली, नवीन पनवेल, रसायनीपर्यंत जेवणाचं वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी जोरदारपणे तयारी सुरू असून सुमारे 10 लाख व्यक्तींचं जेवण तयार केलंय. प्रत्येकाला 2 भाकरी भाजी एक पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे. पनवेल परिसरातील प्रत्येक घरातून दहा दहा भाकरी, पोळ्या दिल्या असून भाजीची सोय देखील करण्यात येत आहे. पदयात्रेतील आंदोलकांचं दुपारचं जेवण पनवेलमध्ये होणार आहे. संध्याकाळच्या सुमारास एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये जेवण आणि राहण्याची सोय करण्यात आलीय.