नवी मुंबई Manoj Jarange Patil Sabha :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर वाशी येथील शिवाजी चौकामध्ये जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधलं. जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी सकाळपासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाज बांधवांची अलोट गर्दी केली होती. यावेळी मराठा बांधव 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणाबाजी देत होते.
तर, आझाद मैदानात जाणार : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा नवी मुंबईत येऊन धडकला आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी सरकारनं मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, या मागण्यांचा अध्यादेश निघाला नाही, तर आपण आझाद मैदानात गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यासाठी सरकारला जरांगे पाटील यांनी शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत वेळ दिला आहे.
जरांगे यांच्या 'या' मागण्या मान्य? : मराठा समाजातील बांधवांना आरक्षण देण्यासाठी सरकारनं 54 लाख नव्हे, तर 57 लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती दिली आहे. 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्याची माहिती सरकारच्या वतीनं दिली आहे. तसंच ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, त्या आधारे सग्यासोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. यामुळे किमान सव्वा दोन कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. ज्यांच्याकडं नोंद सापडल्या, त्यांच्या नातेवाईकांनी शपथपत्र करून घ्यावं, जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. त्यांना लवकरात लवकर जात प्रमाणपत्र मिळतील, अशी ग्वाहीसुद्धा सरकारच्या वतीनं सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली असल्याचं जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येईल असं भांगे यांनी सांगितलं. मात्र, त्यात मुंलांच्या शिक्षणाचा उल्लेख नसल्याचं जरांगे यांनी म्हटलंय.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक : जरांगे पाटील वाशीमध्ये आल्यानंतर सभेकरिता मराठा आंदोलकांनी गर्दी केली होती. सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपन्न झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शिवाजी चौकात संबोधलं. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असं जरांगे पाटलांनी जाहीर केलं आहे.