नवी मुंबई :Maratha reservation : छत्रपती शिवजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. हा सर्व मराठा एकजुटीचा विजय आहे असं म्हणत शिंदे यांनी सर्वांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांचाही यावेळी सन्मान केला. देशाचंच नाही, तर जगाचं लक्ष या आंदोलनाकडं लागलं होत. मराठा बांधवांनी एकजूट ठेवली, कशालाही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केलं, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मनापासून सर्वांना धन्यवाद दिले. मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांवर आणि मराठा बांधवांचं जरांगे यांच्यावर किती प्रेम आहे, ते इथं दिसून आलं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठ्यांना जे पाहिजे ते आजपर्यंत मिळालं नाही : "मी सुद्धा एक गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मला मराठा बांधवांच्या परिस्थितीची जाणिव आहे. मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून मी शिवरायांची शपथ घेतली होती. ती मी पूर्ण केली. आज माझे गुरू आनंद दिघे यांची जयंती आहे. तर काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब ठाकरेंची जयंती झाली. या महान नेत्यांचे आशीर्वाद आहेत. स्व. आण्णासाहेब पाटलांच्या भूमित हा सोहळा होतोय. हे आमच सरकारं म्हणजे तुमच सरकार आहे. हे सरकार मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेते," असंही मुख्यमंत्री म्हणाले. मराठ्यांनी अनेक लोकांना नेता केलं, अनेकांना मोठ्या पदावर बसवलं. मात्र, मराठ्यांना जे पाहिजे ते आजपर्यंत मिळालं नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आम्ही हे देणारचं होते असंही सांगितलं.
मुख्यमंत्रीही तुमच्यातलाच सामन्य माणूस : "मराठवाड्यात कधी कुणबी नोंदी सापडत नव्हत्या. मात्र, आता लाखो नोंदी सापडल्या आहेत. आजपर्यंतही सापडल्या असत्या पण सरकारची देण्याची भावना नव्हती. परंतु, काळजी करु नका, आपलं सरकार घेणारं नाही, तर देणारं आहे. त्यामुळं घाबरू नका आम्ही तुम्हाला सर्व सहकार्य करणार" असंही शिंदे म्हणाले. तसंच, "हा मुख्यमंत्रीही तुमच्यातलाच सामन्य माणूस आहे. आ सर्व पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. ते लवकरच होईल. परंतु, सर्व मराठा समाजाला सर्व ओबीसीच्या सुविधा मिळतील, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. तसंच, सर्व गु्न्हे माफ केले जातील," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांचे आभार मानले.
काय म्हणाले जरांगे पाटील : मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आंदोलनस्थळी वाशी इथं दाखल झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दोघांनीही अभिवादन केलं आणि या विजयाबद्दल अभिनंदन करत मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांनी एकमेकांना पेढे भरवले. त्यानंतर जरांगे पाटील बोलायला उभं राहिले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमडळाचे आभार मानले. "ज्या 54 लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्यात यावेत. तसेच, फक्त एका व्यक्तीला नाही तर सग्या-सोयऱ्यांनाही देण्यात यावेत, अशी आपली मागणी होती. त्यालाही सरकारनं जीआर काढला, त्याबद्दल सबंध मराठा समाजाच्या वतीनं आपले आभार" अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.