मुंबईMaratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणारे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी विधेयकाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. "आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण हवं आहे. उद्या आमच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल", असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. तसंच या बाबत विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला : "मराठा आरक्षण विधेयक आज दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं, ही अत्यंत समाधानाची, आनंदाची बाब आहे. मराठा समाजाचं मागासलेपण लक्षात घेता मराठा आरक्षण टिकणारं आहे. सर्वांच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या काही त्रुटी दूर करून हा प्रश्न सुटला आहे", अशी प्रतिक्रिया भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीय.
मराठा आरक्षणावर शंका :"मराठा आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज एकमतानं मंजूर करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्यात मराठा आरक्षणाची पूर्ण दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चे निघाल्यावर दिलेल्या आश्वासनानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते पूर्ण केलं. महत्त्वाची बाब म्हणजे आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, यापूर्वी हे आरक्षण रद्द करताना झालेल्या चुका दुरुस्त करून आरक्षण देण्यात आलं. त्यामुळं मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार आहे, असा दावा शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.