छत्रपती संभाजीनगर Rajshri Umbre Calls Off Hunger Strike :मराठा आरक्षण लढ्याचा शेवट गोड होणार असल्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं. मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी राजश्री उंबरे या आंदोलक गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसल्या होत्या. सरकार तर्फे दीपक केसरकर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आलं. यावेळी "पुढील दोन आठवड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या देखील अशाच असल्यानं त्यांना सोबत घेऊन पुढील चर्चा करू. त्यासाठी दोन आठवडे लागणार आहेत," असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. करण्यात आलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन मिळाल्यानं उपोषण स्थगित करत असल्याचं राजश्री उंबरे यांनी घोषित केलं.
14 दिवसांपासून सुरू होते उपोषण :मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा, यासह इतर 21 मागण्यांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्षा राजश्री उंबरे यांनी उपोषण सुरू केलं होतं. निझामाच्या राजवटीत आरक्षणात असलेल्या समाजाला आज आंदोलन करावं लागत आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्या, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या अशा मागण्यांसाठी 14 दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेलं. त्यावेळी सर्व मागण्यांबाबत चर्चा झाली, त्यानुसार राजश्री उंबरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रविवारी सायंकाळी शहरात दाखल झालं. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अल्पसंख्यांक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांबाबत चर्चा केली.