मुंबई Stone Pelting On Mumbai Police : निवडणुका संपल्यानंतर पालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यास सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वीच पालखीनं अंधेरी येथे अनधिकृत बांधकामावर जेसीबी चालवला. अंधेरी येथे पालिकेनं तीन इमारती पाडल्या. त्यानंतर आता पालिका एस विभागातील पवई मधील जय भीम नगर येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलं आहे. पालिकेचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस मिळून ही कारवाई करण्यासाठी पवई जय भीम नगर येथे दाखल झाले असता, जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांवर केली दगडफेक: पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पवई येथील जय भीम नगर वसाहतीतील काही अनधिकृत बांधकामांना यापूर्वीच 'अनधिकृत बांधकाम' हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वारंवार नोटिसा पाठवून देखील अनधिकृत बांधकाम नागरिकांकडून न हटवण्यात आल्यानं मुंबई पोलिसांच्या मदतीनं पालिकेनं ही कारवाई करण्याचं ठरवलं. त्यानुसार सकाळी साडेदहा वाजता पालिका आणि पोलीस कर्मचारी जय भीम नगर येथे दाखल झाले होते. या कर्मचाऱ्यांनी साडेदहा वाजता अनधिकृत बांधकामावर पाडकामाच्या कारवाईला सुरुवात केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईला जय भीम नगरीतील स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला. पालिकेची कारवाई सुरू असतानाच येथे मोठा जमाव दाखल झाला. त्याचवेळी या जमावातून दगडफेकीला सुरुवात झाली.