जालना Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी रात्री उशिरा भेट घेतली. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून त्या अनुषंगानं प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केलीय. आज प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर भेटीत काय चर्चा झाली, याबाबत मी 30 तारखेला बोलणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. ते अंतरवाली सराटीत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते.
आम्हाला आता सत्तेत यायचं : यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "हे सरकार नुसता वेळ काढूपणा करत आहे. विशेष बाब म्हणजे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळं आता आम्हाला यांच्याकडून घ्यायचं नाही तर आम्हाला आता देणारं व्हायचं आहे. त्यामुळं आम्हाला आता सत्तेत यायचं आहे. आपल्या लोकांना आपणच निवडून देऊन न्याय घ्यायचा आहे. त्यासाठी मी येत्या 30 तारखेला योग्य तो निर्णय घेणार आहे." पुढे जरांगे पाटील म्हणाले, " त्यांनी कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालांना भाव नाही. त्यात कापूस, तूर, सोयाबीन, मका या प्रमुख पिकांना भाव नाही. आता शेतकऱ्यांच्या शेतातला घरातला कापूस संपला. त्यानंतर कापसाचे भाव वाढवले. हा कुठला न्याय? त्याकरता आता न्याय देणारं व्हायचं आहे. आपल्याला आता सत्तेत जायचं आहे, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले.