छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Manoj Jarange News : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नेतृत्व केलं. यानंतर आताही राज्यातील अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील दौरे करत असून मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. तसेच अनेक सभांमध्ये संबोधित करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा झाल्यानं मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (23 मे) छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे पार पडलेल्या सभेत बोलत असताना माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव आखला जातोय, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? :यावेळी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, "माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव आखला जातोय. इतकं नीच सरकार कधी पाहिलं नाही. मी डावाला लागलो, आता माझं कुटुंब लागलं. माझं कुटुंब उद्याला जिवंत नसलं तरी मी बाजूला हटणार नाही. मी माझ्या बापाला आणि बायकोला अगोदरच सांगितलंय की डोळ्यात पाणी आणू नका. मी गेलो तरी माझ्या बापाला तीन मुलं आहेत. माझं रक्षण करायला माझा समाज आहे. काही झालं तरी शांत राहा. उपोषणामुळं शरीर साथ देत नाही म्हणून तुम्हा सर्वांना जबाबदारी देतो. मी तुमच्यात असो किंवा नसो तरी समाज फुटू देऊ नका." "तसंच राजकीय लोकांसाठी फुटू नका. आमरण उपोषण होणारच," असा इशाराही जरांगे यांनी दिला.
भुजबळांवरही साधला निशाणा : पुढं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत जरांगे म्हणाले की, "आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. इतके दिवस इतरांनी खाल्लं आता आम्हाला द्या. तो एक नेता म्हणतो, आता आरक्षणाची एसटी फुल झाली. एसटी फुल असेल तर दार उघडून दाखवा. जर नाही दाखवलं तर ओबीसीमधूनच आरक्षण घेऊ. कारण ती बस आतमधून रिकामीच आहे", अशी टीका जरांगे यांनी केली.