पुणेManoj Jarange News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पायी मोर्चा घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मोर्चा पुण्यापर्यंत पोहोचल्यावर, गर्दीमुळे लोकांना त्रास होईल अशी चर्चा सुरू आहे. ''आम्ही कुणाला त्रास व्हावा यासाठी येत नाही. जे या शहरात राहतात त्या नागरिकांच्या हक्कांसाठीही आम्ही लढतोय. त्यांनाही न्याय मिळवा. आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही या रस्त्याने जात आहोत. तुमच्याकडे हजारो रस्ते आहेत. एखादा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या. उलट मोठ्या मनाने तुम्ही आम्हाला तांब्याभर पाणी दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.
पुण्यात प्रवेश : छत्रपती शिवाजी महाराज की जय... हर हर महादेव... एक मराठा, लाख मराठा.. अशा घोषणा देत भगवे झेंडे घेऊन लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला. तोच उत्साह, जल्लोष, जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या रॅलीचं बुधवारी म्हणजे आज दुपारी पुणे शहरात आगमन झालं.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात : हा मोर्चा संचेती हॉस्पिटलजवळील चौकातून औंधच्या दिशेने जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिकांची चौकात गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना क्रेनच्या सहाय्याने शंभर किलोचा हार घालून स्वागत करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. चौकात रस्त्याच्या कडेला छोटेखानी स्टेज उभारण्यात आलं आहे. तसंच, रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाणी वाटपाची सोयही केली आहे. सत्कारानंतर त्यांचे भाषणही होणार असल्याचं सत्कार आयोजित करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.