जालना Manoj Jarange Health Deteriorated : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज (21 सप्टेंबर) पाचवा दिवस आहे. शुक्रवारपासून (20 सप्टेंबर) जरांगे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळं त्यांच्या समर्थकांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला. तसंच मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना फोन करुन उपचार घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मध्यरात्री उपचार घेतले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आलं.
शंभूराज देसाईंच्या विनंतीनंतर घेतले उपचार : सगे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. यावेळी त्यांना चालणं देखील कठीण झालं. परंतु तरीही ते उपचार घेण्यास तयार नव्हते. मात्र, समर्थकांनी आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या विनंतीनंतर अखेर जरांगेंनी उपचार घेण्यास होकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना 'मला उद्यापर्यंत वेळ द्या' अशी विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी उपचार घेतले.