ठाणे Man Reunited With Mother : "वेड्या आईची वेडी ही माया" हा वाक्य प्रचार ठाण्यातील मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांना 'याची देह, याची डोळा' अनुभवास मिळाला. मनोरुग्णालयातून उपचार घेऊन बरा होऊन घरी परतणाऱ्या (नावात बदल केलेला आहे ) सुहास याला घरात घेण्यास चक्क त्याचा भावांनी नकार दिला. हे नाट्य़ तब्बल तीन तास रंगलं. अखेर गावावरुन आलेल्या सुहासच्या आईनं त्याला मायेनं जवळ घेतलं. तीन भावानी नाकारलेल्या सुहासला आईनं छत्रछाया दिली. भावांच्या नकारानंतर एका क्षणात कुणी आपलं नाही, असं वाटलेल्या सुहासला आईच्या मिळालेल्या प्रेमानंतर झालेला आनंद हा त्याच्या पेक्षा जगात कुणीच श्रीमंत नाही, इतका झाला. त्यामुळे त्याच्यासोबत मनोरुग्णालयातील आलेले कर्मचारीही भावूक झाले.
नाईलाजानं पोटच्या गोळ्याला मनोरुग्णालयात केलं दाखल :सुहासला चाळीसगाव इथं राहणाऱ्या त्याच्या भावानं 10 ऑक्टोबर 2022 रोजी मनोरुग्ण झाल्यानं ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मनोरुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर सुहास याला स्किझोफ्रेनियाची लक्षणं आढळली होती. त्यावर उपचार घेणं अत्यावश्यक होतं. पन्नाशी ओलांडणाऱ्या सुहास याच्यावर आईची सावली होती. हीच ईश्वराची किमया म्हणावी लागेल. पण नाईलाजानं पोटच्या गोळ्याला मनोरुग्णालयात दाखल केल्याचं दुःख त्या आईला होतं. तब्बल दीड वर्ष सुहासवर ठाण्याच्या मनोरुग्णालयात उपचार करण्यात आले, अन् सुहास बरा झाला.
भावांनी स्वीकारण्यास दिला नकार :मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानं त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सुहासला घरी घेऊन जाण्यासाठी संपर्क केला. मात्र एकानंही रुग्णालयाशी संपर्क साधला नाही. तर त्यांनी समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांचा मोबाईल नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. त्यानंतर सतीश वाघ यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशन आणि नातेवाईकांशी पत्रव्यवहार केला. तसेच व्हॉट्सअॅप संदेश पाठविले, पण काही उपयोग झाला नाही. नातेवाईकांनी तर दादच दिली नाही. मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या आदेशानुसार सुहासला रुग्णालयातील शासकीय वाहनातून तीन कर्मचारी आणि एका वाहनचालकाच्या मदतीनं त्याच्या घरी नेण्यात आलं. मात्र भाऊ बरा होऊन घरी आल्याचा आनंद सोडा, त्यांनी नाटक केलं. या नाटकावर त्या माऊलींनी पडदा टाकला.