मुंबई : सैफ अली खानच्या हल्लेखोराला पाच दिवसांची पोलीस कोठडी वांद्रे न्यायालयानं सुनावली आहे. आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
पाच दिवसांची पोलीस कोठडी : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेला संशयित बांगलादेशी नागरिक असल्याने याप्रकरणी आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांना मिळवावी लागतील 'या' प्रश्नांची उत्तरं : चोरी व हल्ला प्रकरणातील मुख्य उद्देश काय होता? यामध्ये आणखी कोणी साथीदार सहभागी आहे का? एवढ्या कडेकोट बंदोबस्तात सुरक्षा यंत्रणांना चुकवून आरोपी थेट सैफ अली खानच्या घरात कसा प्रवेश करू शकला? आरोपीचा केवळ चोरीचा हेतू होता की त्याला खंडणी मागायची होती? की त्याला सैफ अली खानची हत्या करायची होती? त्या विविध प्रश्नांची उत्तरे मुंबई पोलिसांना आता अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळवणे गरजेचे आहे.
आरोपी बांगलादेशातील? : ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटजवळील लेबर कॅम्प परिसरातील जंगलातून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच परिसरात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आरोपी विजय दास या बनावट नावाने काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितलं. अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशातील झलोकाठी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.
आरोपीविरोधात कोणती कलमं? :अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 311, 312, 331(4), 331(6) व 331 (7) नुसार गुन्हा नोंदवला आहे. भारतात प्रवेशास प्रतिबंध अधिनियम 1948 चे कलम 3 ए व 6 ए तसेच परकीय नागरिक आदेश कलम 3 (1) व 14 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवार हा उपचाराचा चौथा दिवस आहे. आता त्याची तब्येत स्थिर असल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई पोलीस या घटनेसंदर्भात सैफ अली खानचा जबाब आजच नोंदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा -
- सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय, कारण काय?
- सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात 5 धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर