मुंबई Mahayuti Seat Allocation : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटप संदर्भात चर्चेच्या फेऱ्या घडत असतानाच घटकपक्षांनी आपापल्या ताकदीनुसार जागांची मागणी केली आहे. महायुतीच्या घटक पक्षातील मुख्य पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं 160 जागांची मागणी केली असून अन्य पक्षांनी उरलेल्या जागा वाटून घ्याव्यात असा भाजपाचा आग्रह आहे. शिवसेना शिंदे गटानं 100 जागांवर दावा केला आहे. मात्र, त्याचवेळी सुरुवातीला शंभर जागांवर दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आता 60 जागा लढवण्यावर संमती दर्शवली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्टता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 60 जागांवर लढणार हे निश्चित झालय. मात्र, या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येणार आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना किती जागा मिळणार? हा नवीन प्रश्न निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळं आता शिवसेना शिंदे पक्षाची बार्गेनिंग पॉवर आपसूक कमी झाली आहे का? असा नवीन प्रश्न निर्माण झालाय.
आमच्या ताकदीवर काहीही परिणाम नाही :या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेना शिंदे गटाचे सहप्रमुख प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे म्हणाले, "अजित पवार यांनी 60 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलय. कदाचित त्यांच्या पक्षात तेवढ्याच जागा लढवण्याची ताकद असावी. त्यामुळं त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार जागांची स्पष्टता केली आहे. आमच्या पक्षाची ताकद ही त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळं आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. अजित पवार यांनी केलेल्या मागणीमुळं आमच्या पक्षाच्या बार्गेनिंग पॉवरवर कुठलाही परिणाम झालेला नाही. आमची महाराष्ट्रात असलेली ताकद पाहता आम्ही आमच्या वाट्याच्या जागांवर ठाम आहोत आणि त्याबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील", असंही वाघमारे यांनी स्पष्ट केलं.