नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर बुधवारी पहाटे चार वाजेपासून गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत तब्बल 41 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. गर्दीच्या नियोजनासाठी भाविकांना पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचं श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात आलं आहे.
मेहंदी आणि हळदीचा समारंभ संपन्न : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचं सभा मंडप, गर्भगृह, उत्तर प्रवेशद्वार आणि पूर्व महाद्वार येथे फुलांची सजावट करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी 24 आणि 25 फेब्रुवारीला मेहंदी आणि हळदीचा समारंभ संपन्न झाला. परंपरेनुसार महाशिवरात्रीला दुपारी तीन वाजता श्री त्रंबक राजांची पालखी मंदिरातून पारंपारिक मार्गाने निघणार आहे. तीर्थराज कुशावर्त येथे षडोपचार पूजा करून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पालखी पुन्हा मंदिरात येणार आहे. पालखी सोहळ्यात शिवतांडव ग्रुप तर्फे मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये अघोरी नृत्य सादर केलं जाणार आहे.
प्राजक्ता माळीचं होणार शिवार्पणमस्तू नृत्य : बुधवारी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार रात्री आठ वाजता नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत "शिवार्पणमस्तू नृत्य" हा कार्यक्रम सादर करणार आहे. यानंतर कथक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्रंबकेश्वर देवस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे.