साई बाबांच्या प्रसादालयात 15 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद शिर्डी Mahashivratri 2024 Celebration In Shirdi :देशभरात आज महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशभरातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डीत देखील साई बाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविकांना गर्दी केली आहे. साई बाबांच्या शिर्डीत 15 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद तयार करण्यात आला आहे.
साई प्रसादालयात 15 हजार किलो साबुदाणा खिचडी :आज महाशिवरात्री निमित्तानं साई बाबांच्या मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरांना फुलांनी सजवण्यात आलंय. आज दिवसभर साई बाबांच्या समाधीजवळ देवाधी देव महादेव यांची प्रतिमा साईबाबा संस्थानच्या वतीनं ठेवण्यात आली आहे. आज भाविक साई बाबांच्या दर्शनाबरोबरच महादेवाचंही दर्शन घेत आहेत. आज दिवसभरात मोठ्या संख्येनं भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत. या सर्व भाविकांना महाशिवरात्री निमित्तानं उपवास असल्यानं साईबाबा संस्थानच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या साई प्रसादालयात 15 हजार किलो साबुदाणा खिचडी बनवण्यात आली आहे.
साबुदाणा खिचडी आणि झिरक हाच प्रसाद :भाविकांना आज उपवास असल्यानं साई संस्थानच्या प्रसादालयात दिवसभर साबुदाणा खिचडी आणि झिरक हाच प्रसाद दिला जातोय. साई संस्थानच्या प्रसादालयात 6300 किलो साबुदाणा, 4450 क्विंटल शेंगदाणे आणि 1 हजार किलो तूप, साखर 450 किलो, मीठ 450 किलो, लाल मिरची पावडर 114 किलो, हिरवी मिर्ची 250 किलो आणि बटाटा 2500 किलो वापरुन बनवलेली खिचडी आणि त्या बरोबर झिरक्याचा प्रसाद भक्त मोठ्या भक्तीभावानं ग्रहण करत आहेत.
शिर्डीत 60 हजार भाविक घेणार खिचडीचा लाभ :साई बाबांच्या दर्शनासाठी सर्वधर्मीय भक्त शिर्डीत येतात. त्यातील बहुतांशी भक्त साई संस्थान मार्फत चालवल्या जात असलेल्या प्रसादालयात जात प्रसाद ग्रहण करतात. एरव्ही दोन भाज्या, चपाती आणि वरण भात, असा प्रसाद भाविकांना साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रसादालयात दिला जातो. मात्र आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना उपवास असल्यानं स्पेशल साबुदाणा खिचडी आणि झिरक्याचा प्रसाद साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात येतो. "आज दिवसभरात देशभरातील भाविकांसह शिर्डीसह पंचक्रोशीतील सुमारे 60 हजार भाविक साई खिचडीचा लाभ घेणार आहेत," ही माहिती साई प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- शिर्डीत साई परिक्रमा सोहळा; हजारो साईभक्तांच्या जयघोषानं दुमदुमली साईनगरी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दीर्घायुष्याकरिता खा. सदाशिव लोखंडे यांचे साईचरणी साकडे; पाहा व्हिडिओ
- निवृत्तीच्या पैशातून आणि मातृ प्रेमातून साई चरणी केली रुग्णवाहिका दान