महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतका' महागाई भत्ता वाढला - DEARNESS ALLOWANCE

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dearness Allowance
महागाई भत्ता (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2025, 8:46 PM IST

मुंबई : राज्‍य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. सरकारनं महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केली असून ही वाढ १ जुलै २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. १ जुलैपासूनचा महागाई भत्ता थकबाकीसह फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

१७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ :शासन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार सुधार‍ित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर अनुज्ञेय महागाई भत्ता ५० टक्क्यांवरुन ५३ टक्के करण्यात आला आहे. १ जुलै २०२४ पासून वाढ लागू करण्यात आली असून १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारी महिन्यातील वेतनात वाढीव दराने देण्यात येईल. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत सध्या असलेल्या तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. याशिवाय निवृत्तीवेतन धारकांनाही याचा लाभ मिळणार आहे.



महागाई भत्ता वाढविण्यास झाला विलंब : साधारणत: १ जानेवारी आण‍ि १ जुलैपासून महागाई भत्ता वाढविण्याचे धोरण आहे. हे धोरण केंद्र सरकारच्या धोरणानुसार आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षीच दिवाळीपूर्वी महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून ५३ टक्क्यांवर नेला होता. राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्याही महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा करण्यात येत होती. मात्र, तसं झालं नव्हतं. त्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.



केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही लवकरच गोड बातमी: केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. त्यापूर्वी यावर्षी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार, १ जानेवारीपासून अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता लवकरच वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. ही वाढ मार्च महिन्यात होऊ शकते, असा अंदाज आहे. तसे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५६ टक्के होईल.

हेही वाचा -

  1. Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात मोठी वाढ, पेन्शनधारकांनाही लाभ मिळणार
  2. Dearness Allowance Increases : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ!
  3. Dearness Allowance hike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, चार टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता

ABOUT THE AUTHOR

...view details