पुणे SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकाल येत्या 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे, अशी माहिती बोर्डानं दिलीय.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकंण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. नुकतच बारावीचा निकाल जाहीर झाला होता. यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना होती. येत्या सोमवारी दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह 6 ठिकाणी निकाल पाहता येईल.
कुठं चेक करावा निकाल?
- https://mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे : ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यानं संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडं ऑनलाईन पध्दतीनं मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
- मार्च 2024 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीनं अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करावयाचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडं संपर्क साधावा.
- मार्च 2024 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट 2024 व मार्च 2025) श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
- जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 'मनुस्मृती'चा समावेश केल्यानं 'मनुचे राज्य' येणार का? राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू - Manusmriti Controversy