मुंबई - "मी पुन्हा येईन, असं ठामपणे सांगणारे, त्याहीपेक्षा जोमाने महाविकास आघाडीला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी सुनामीसारखे पुन्हा आलेले देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी कराडमध्ये माध्यमाशी बोलतानं सांगितलं आहे.
महायुतीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता निवडणुका लढविल्या आहेत. मुख्यमंत्री पदाचा निर्णय तीनही पक्षाचे प्रमुख एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्ट केली.
जर तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्यास आणि भाजपा हायकमांडकडून अनुकूलता दर्शविण्यात आल्यास देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषणिवणारे मुख्यमंत्री ठरू शकतात. सूत्राच्या माहितीनुसार अडीच वर्ष ते राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा वाहू शकतात. त्यानंतर अडीच वर्षासाठी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा आहे. मात्र, या निर्णयाबाबत दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्यमंत्री पदाच्या नावाकरिता चर्चा नसलेल्या व्यक्तीची निवड होत असते, असे वक्तव्य भाजपाचे महामंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी केले होते.
फडणवीस यांच्या नावाला सर्वाधिक पसंती-१५ व्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत विरोधी पक्षनेते पदही त्यांना मिळणार नाही, अशी महायुतीनं अवस्था करून ठेवली आहे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहीली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
केवळ राजकीय चर्चा सुरू-मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्या नावाला संमती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीची अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी दिली जातील, अशी चर्चा आहे. तर शिवसेनेचे गटनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशाही चर्चा आहेत.
मुख्यमंत्री पदाबाबत कुठलीही चर्चा नाही-मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती बाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी त्यांची निवड झाली. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली. तर भाजपाचा गटनेता आज निवडला जाणार आहे. यानंतर हे तिन्ही गटनेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करणार आहेत. "शपथविधीसाठी आता आम्हाला कुठलीही घाई नाही. कारण आमचं बहुमत सिद्ध झालं आहे. तरीही लवकरात लवकर शपथविधी उरकला जाईल," असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
- २-२-१ वर्षासाठीचा फॉर्म्युला नाही-अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपद द्यावं, असा राष्ट्रवादीकडून वाढता दबाव होत आहे. याकरिता राज्यात अडीच-अडीच वर्षांऐवजी २-२-१ वर्षासाठी मुख्यमंत्री पदाचं सूत्र ठरवलं जावं, अशी मागणीही राष्ट्रवादीकडून होत आहे. परंतु या मागणीबाबत बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या सूत्राला नकार दिला आहे. अशा पद्धतीचा फॉर्मुला कुठल्याही पद्धतीत शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आणि दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन निर्णय घेतील. याकरता यामध्ये कुठलाही वाद नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे.
तिन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट मजबूत-भाजपानं महाराष्ट्रात ८९ टक्के स्ट्राइक रेटने १३२ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने ७२ टक्क्यांच्या स्ट्राइक रेटनं ५७ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं ७७ टक्क्यांच्या स्ट्राईक रेटनं ४१ जागा जिंकल्या आहेत. याप्रमाणे तिन्ही पक्षानं सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
भाजपासाठी दोन्ही पक्ष महत्त्वाचे-राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे? "मुख्यमंत्री पदासाठी एकाच पक्षाने आग्रह धरणे चुकीचं ठरलं जाऊ शकतं. कारण भाजपाला सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष गमवायचे नाहीत. जर का एकनाथ शिंदे नाराज झाले तर ते उद्धव ठाकरे यांचं पुनर्जीवन करू शकतात. दुसरीकडे अजित पवार नाराज झाले तर ते शरद पवारांनाही संधी देऊ शकतात," असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांचं मत आहे.
मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही नेत्यांच्या काय आहेत मजबूत बाजू
देवेंद्र फडणवीस
- फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे.
- त्यांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे जवळचे संबंध आहेत.
- राज्यातील भाजपचा सर्वात मोठा नेता आणि ब्राह्मण चेहरा आहेत.
- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युती करण्यामध्ये त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
- महायुतीच्या प्रचारासाठी रणनीती करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली आहे.
एकनाथ शिंदे
- उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारा शिवसेचा राज्यातील महत्त्वाचा नेता अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे.
- त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदी राहून विकास योजनांबरोबर लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली.
- मराठा असल्याकारणानं सत्तेविरोधात लाट थोपविण्यात आणि मराठा आंदोलन यशस्वीपणे हाताळले
- शिवसेना पक्ष फोडून सोबत ४१ आमदार आणले. ती संख्या आता ५७ आमदारांवर नेली. त्यामुळे महायुतीची ताकद वाढविण्यात महत्त्वाचा वाटा राहिला.
- असली-नकली शिवसेनेच्या लढाईत पक्ष, चिन्ह मिळवून राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा वरचढ ठरले आहेत.
अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे वक्तशीर, प्रशासनावर पकड असलेले आणि अत्यंत कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जातात.
- काका शरद पवार यांना शह देत अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी झाले.
- पश्चिम महाराष्ट्रासोबत मराठवाड्यातील अनेक भागात त्यांची मजबूत पकड आहे.
- ४३ वर्षाचा राजकीय दांडगा अनुभव असल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेशी दांडगा जनसंपर्क आहे.
- राष्ट्रवादी पक्ष फोडून ४० आमदार सोबत घेतले आता ४१ केले. त्यामुळे महायुतीची ताकद वाढविण्यात महत्त्वाचा वाटा राहिला.
हेही वाचा-
- 'शहाण्या, थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती, तर . .'; अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला; काका पुतण्यात 'प्रितीसंगम'
- सायबर कॅफे चालक ठरला जायंट किलर, अमोल खताळ यांचा थक्क करणारा जीवन प्रवास