मुंबई LOP Ambadas Danve Suspension :विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राहुल गांधी यांच्या मुद्द्यांवरुन आमदार प्रसाद लाड यांना कथित शिवीगाळ केली. या प्रकरणी आज सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली. प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. दानवे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा त्यांनी पवित्रा घेतला. अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केल्याची घोषणा केली.
काय आहे प्रकरण : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत गदारोळ झाला होता. अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना कथित शिवीगाळ केली होती. त्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवे यांनी माफी मागावी, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रसाद लाड यांच्याकडं पाहताना अंबादास दानवे यांनी अर्वाच्य भाषा वापरली. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबद्दल त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात यावं.
निलंबनानंतर काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे : गटनेत्यांच्या बैठकीत अंबादास दानवे उपस्थित नव्हते, असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. कालच्या घटनेबद्दल त्यांनी माफी मागितली नाही. काल आपल्या समोर हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे. याचा विचार त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी करायला हवा. भविष्यात महिलांना काम करणं कठीण होणार आहे. त्यामुळं त्यांचं निलंबन एक न्याय्य तसंच योग्य कृती आहे.