मुंबई Lok Sabha Second Phase Voting : देशभरातील 89 मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 64.70 टक्के मतदान झालं. तर यापैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात 53.51 टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदार संघात सर्वाधिक 56.66 टक्के मतदान नोंदवण्यात आले, तर हिंगोलीत सर्वात कमी 52.03 टक्के मतदान झाले.
लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी :
वर्धा - 56.66 टक्के
अकोला -52.49 टक्के
अमरावती - 54.50 टक्के
बुलढाणा - 52.24 टक्के
हिंगोली - 52.03 टक्के
नांदेड - 52.47 टक्के
परभणी -53.79 टक्के
यवतमाळ-वाशिम - 54.04 टक्के
'या' चर्चेतील मतदारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानामुळं प्रकाश आंबेडकर (अकोला), रवी राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा) या महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालंय.
वर्धा लोकसभा मतदारसंघ : वर्ध्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.66 टक्के मतदान झालं. वर्ध्यात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे विरुद्ध भाजपाचे खासदार रामदास तडस अशी लढत आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघ : अकोला मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.49 टक्के मतदान झाले. यापूर्वी अकोल्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.69 टक्के मतदान झाले होते. अकोल्यात भाजपचे खासदार पुत्र अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ : अमरावती लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54% मतदान झालं. अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 61.33% मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालं. अचलपूर आणि चांदूरबाजार असे दोन तालुके मिळून अचलपूर विधानसभा मतदारसंघ असून आमदार बच्चू कडू यांचा हा मतदार संघ आहे. अचलपूर मतदारसंघाला लागून असणाऱ्या मेळघाट मतदार संघात 55.20% मतदान झालं आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ : बुलढाणा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.24 टक्के मतदान झालं. यापूर्वी बुलढाण्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.66 टक्के मतदान झालं होतं. येथे शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतापराव जाधव यांची लढत ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांच्याशी आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघ : हिंगोलीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.03 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदान झालं होतं. हिंगोलीत शिवसेनेनं (शिंदे) बाबुराव कोहळीकर यांना तिकीट दिलंय. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटानं नागेश पाटील आष्टीकर यांना उभं केलंय.
नांदेड लोकसभा मतदारसंघ : नांदेड मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.47 टक्के मतदान झालं. दुपारी 3 वाजेपर्यंत येथे 42.42 टक्के मतदान झालं होतं. नांदेडमध्ये खासदार प्रतावराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण अशी लढत आहे.