महाराष्ट्र

maharashtra

लखपती दीदी, लाडकी बहीण, लाडका भाऊनंतर आता येणार 'ड्रोन दीदी'; काय आहे नेमकी ही योजना? - Drone Didi Yojana

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 9:35 AM IST

Drone Didi Yojana : लोकसभा निवडणूकीच्या दारुण पराभवानंतर राज्य सरकारकडून मत पेरणीसाठी विविध योजना जाहीर केल्या जात आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला राज्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. अशातच महिलांसाठी राज्य सरकारनं 'ड्रोन दीदी योजना' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Drone Didi Yojana
ड्रोन दीदी योजना फाईल फोटो (File Photo)

मुंबई Drone Didi Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं जनतेसाठी घोषणांचा पाऊस पाडायला सुरू केलाय. राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वयंरोजगारासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. 'लखपती दीदी' योजनेनंतर राज्यात लागू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्या पाठोपाठ आता सरकारनं राज्यातील महिलांसाठी 'ड्रोन दीदी' योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सचिवांनी दिली.

एक कोटी 80 लाख अर्ज दाखल :आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं महिलांसाठी आणि तरुणांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. राज्य सरकारनं नुकतीच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर केली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक कोटी 80 लाख महिलांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सरकारनं दिली आहे. त्यापूर्वी सरकारनं महिलांसाठी 'लखपती दीदी' योजना जाहीर केली होती. राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वयंरोजगारासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे आता राज्यात महिलांच्या स्वयंरोजगारासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आणखी काय करता येईल याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

आता 'ड्रोन दीदी योजना' :'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशानंतर आता राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत 'ड्रोन दीदी योजना' राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती कृषी विभागाचे अवर सचिव महेंद्र घाडगे यांनी दिली. शेतीमधील उत्पादकता वाढवण्यासाठी आणि श्रम कमी करण्यासाठी केंद्र तसचं राज्य सरकारच्या वतीनं नवनवीन आधुनिक प्रयोग केले जातात. त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पिकांवरील रासायनिक औषधं फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 1000 ड्रोन केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला देण्यात येणार आहेत, अशी माहिती महेंद्र घाडगे यांनी दिली.

कशी असेल 'ड्रोन दीदी योजना'? : महाराष्ट्रात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजही शेतीवर उपजीविका केली जाते. शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग असतो. या महिलांचे श्रम कमी व्हावेत तसंच अचूक फवारणी व्हावी यासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार असून हे ड्रोन महिला बचत गटांना दिले जाणार आहेत. त्यासाठी 'ड्रोन दीदी' ही योजना राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमधील मंडळांच्या अंतर्गत हे ड्रोन वितरित केले जाणार आहेत. संबंधित मंडळांमधील सक्षम असलेल्या बचत गटाला ड्रोन दिले जाणार आहेत. या माध्यमातून महिलांना स्वतःच्या शेतामध्ये फवारणीसाठी ड्रोन वापरता येतीलच याशिवाय अन्य शेतकऱ्यांच्या शेतावरही ड्रोनद्वारे फवारणी करून दोन पैसे मिळवता येतील, अशी यामागील संकल्पना असल्याचे घाडगे यांनी सांगितले. यासाठी ज्या महिला बचत गटांची निवड होऊन त्यांना ड्रोनचे वितरण करण्यात येईल, अशा महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षणही राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणार आहे. या ड्रोन दीदी योजनेमुळे महिला आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत होतील आणि शेतीचाही विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

  1. मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहीण' व्हायचंय? 'असा' दाखल करा ऑनलाईन अर्ज - Ladki Bahin Yojana
  2. विधानसभेची 'मत'पेरणी! 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ'नंतर आता बळीराजासाठी आणली 'ही' योजना - CM Baliraja Free Power Scheme
  3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद - अजित पवार - Majhi Ladki Bahin Yojana

ABOUT THE AUTHOR

...view details