नागपूर- राज्याच्या निवडणुकीत जनतेलं महायुतीला आणि पर्यायानं भाजपाला मोठा विजय मिळवून दिला असून, भाजपा महायुती सध्याच्या घडीला 220 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जातंय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विजयावर आता त्यांची आई सरिता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. जनतेनं देवेंद्रला हा मोठा विजय मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्र आणि जनतेची आता अशी इच्छा आहे की, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी भूषवावं, असंही देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्री सरिता फडणवीस म्हणाल्यात. सरिता फडणवीस यांनी आज नागपुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी त्या बोलत होत्या.
फडणवीसांच्या विजयात लाडक्या बहिणींचं यश :मधल्या काळात फडणवीसांवर आरोप झाल्याचं विचारले असता त्यांच्या आई सरिताताई म्हणाल्या की, मला कोणत्याही आरोप प्रत्यारोपांमध्ये तथ्य वाटत नाही, कारण माझा मुलगा काय आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे मी कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे विजय झाल्याचं विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांच्या विजयात लाडक्या बहिणींचं तर यश आहेच. पण त्याची अविश्रांत मेहनत आणि लोकप्रियताही त्याला कारणीभूत आहे, त्याचंच हे यश असल्याचंही सरिताताईंनी अधोरेखित केलंय.
24 तासांत तो मुलगा फक्त 2 ते 3 तास झोपला :मला मुलगी नव्हती म्हणून इतक्या मुली मिळाल्या. तो अतिशय हुशार आणि चतुर आहे. प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायची त्याची हिंमत आहे. त्यामुळेच तो विजयी झाला. वर्षाच्या सुरुवातीपासून आणि पाचही वर्ष त्याने आपल्यासमोर व्हिजन ठेवलेलं होतं. त्यादृष्टीनं त्याने मेहनत केली, 24 तासांत तो मुलगा दोन ते तीन तासांहून अधिक कधी झोपलेला नाही. प्रचाराच्या काळात तर तो इतका व्यस्त होता की, सकाळी लवकर बाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे त्याच्याशी संवादही साधता आला नाही, असंही त्यांनी सांगितलंय.
माझा मुलगा हा 100 टक्के अभिमन्यू :मी मुख्यमंत्री म्हणून त्याला पाहिलेलं आहे. त्याने किती चांगलं काम केलं होतं आणि लोकांनी किती प्रशंसा केली हेसुद्धा मला माहीत आहे. आताही तो मुख्यमंत्री होणार असून, पाच वर्षांच्या अनुभवानंतर तो उत्कृष्टपणे वरती जाईल. तो सगळ्या लोकांना न्याय देतो. राजकारणात प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार सुरूच असतात. पण देवेंद्र कधीच अशा गोष्टींनी विचलित होत नाही. कोणी कितीही टीका केली तरी तो अविचल असतो. तसेच जनतेलाही हे माहीत आहे. त्यामुळे तो स्वतःच्या बाबतीत खूपच ठाम आहे. माझा मुलगा हा 100 टक्के अभिमन्यू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोण आघाडीवर? जाणून घ्या, राजकीय अन्वयार्थ
- राज्यात सहा जागांवर रंगतदार लढत, बालेकिल्ला वाचवण्याचे पवार अन् शिंदेंपुढे आव्हान