महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळी मतदारसंघाची काय आहे परिस्थिती? दोन शिवसेना आमनेसामने; कोण मारणार बाजी? - MAHARASHTRA ELECTION 2024

या निवडणुकीत मतदारसंघातील समीकरण कशी आहेत? राजकीय गणितं काय आहेत? सुनील राऊत हे विजयाची हॅट्ट्रीक करणार का? या सर्वांचा आपण आज आढावा घेणार आहोत.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2024, 5:51 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मंगळवारी (30 ऑक्टोबर) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सध्या दिवाळीचा माहोल असून, चार तारखेनंतर प्रचाराला जोरदार सुरुवात होईल. या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील तसेच सत्ताधारी-विरोधक यांच्यामध्ये कलगीतुराही रंगताना पाहायला मिळेल. दरम्यान, मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात मुंबईतील विक्रोळी विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आणि चर्चेचा मतदारसंघ मानला जातो. हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. येथे सुरुवातीपासून शिवसेनेचे लीलाधर डाके हे सलग तीन वेळा निवडून आले होते. यानंतर येथे शिवसेनेनं आपली ताकद वाढवलीय. मात्र आता सध्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. यावेळेस शिवसेना (ठाकरे गटाकडून) येथे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना (शिंदे गटाकडून) सुवर्णा महादेव करंजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं इथे दोन शिवसेनेमध्ये कॉँटे की टक्कर होणार असल्याचं बोललं जातंय, मात्र शेवटी बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मतदारसंघातील अनेक प्रश्न 'आ' वासून उभे आहेत. इथल्या मतदारसंघातील काय समस्या आहेत? विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिलाय का? की येथे विकास झालाय? या निवडणुकीत मतदारसंघातील समीकरण कशी आहेत? राजकीय गणितं काय आहेत? सुनील राऊत हे विजयाची हॅट्ट्रीक करणार का? या सर्वांचा आपण आज आढावा घेणार आहोत.

विक्रोळी विधानसभेचा कसा आहे इतिहास?:विक्रोळी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि गड मानला जातो. शिवसेनेचे लीलाधर डाके हे सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1990 साली काँग्रेसचे दिना पाटील यांचा पराभव करत पहिल्यांदा लीलाधर डाके आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 1995 साली दिना पाटील यांच्या पत्नी मनोरमा पाटील यांचाही लीलाधर डाके यांनी पराभव केला. तर 1999 विधानसभा निवडणुकीत सध्याचे खासदार असलेले संजय दिना पाटील यांचा लीलाधर डाके यांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक केली होती. दरम्यान, एकाच मतदारसंघात वडील, आई आणि मुलाचा पराभव करणारे लीलाधर डाके हे एकमेव उमेदवार आहेत. नंतर 2004 विधानसभा निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी लीलाधर डाकेंचा 5000 पेक्षा अधिक मतांनी पराभव करत पहिल्यांदाच शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचे पाणी पाजले. यावेळी संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. यानंतर 2009 रोजी राज ठाकरेंच्या प्रभावामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश सांगळे हे विजयी झाले होते. 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा येथे शिवसेनेचा भगवा फडकला. खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे या मतदारसंघात आमदार आहेत.

काय आहेत मतदारसंघातील समस्या?:ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विक्रोळी विधानसभा मतदारसंघ येतो. भौगोलिकदृष्ट्या विक्रोळी मतदारसंघाचा विचार केल्यास येथे मोठ्या प्रमाणात चाळी होत्या, मात्र आता काही चाळींची जागा गगनचुंबी इमारतींनी घेतलीय. इथे मराठी, गुजराती, मुस्लिम, आणि उत्तर भारतीय असे बहुभाषिक संमिश्र लोकवस्ती आहे. या मतदारसंघात रमाबाई नगर, कन्नमवार नगर, कामराज नगर, कांजुरमार्ग पूर्व, भांडुप पूर्व, टागोर नगर असे वॉर्ड येतात. विक्रोळी मतदारसंघातील समस्या म्हणजे कन्नमवार नगरचा भाग सीआर झेडमध्ये येतो. त्यामुळं इथे विकासाला म्हणावी तशी गती नाही. झोपडपट्टी पुनर्वसन, चांगले रस्ते आणि अनेक झोपडपट्टीत पाण्याची समस्या अजून आहेत. याव्यतिरिक्त पायाभूत समस्या, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रश्न आदी प्रश्न विक्रोळी विधानसभा मतदारसंघ आहेत.

राजकीय समीकरणे काय आहेत? : खरं तर इथे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. मात्र येथे ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील का? याची राजकीय वर्तुळात चर्चा असताना सुनील राऊत यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही, असंही बोललं जातंय. कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर स्वाभाविकपणे मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झालंय. महाविकास आघाडीकडून सुनील राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून शिवसेना (शिंदे गटाच्या) सुवर्णा करंजे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात. दुसरीकडे मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी ही इथे अर्ज दाखल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होणार आहे. महायुतीकडून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मित्रपक्ष हे आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी जोर लावणार यात शंका नाही. त्यामुळे राऊत बंधूंना ही निवडणूक सोपी नसणार आहे. सुनील राऊत हे विजयाची हॅट्रिक करतील का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे मनसेचेसुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मनसेची ताकद असल्यामुळे मनसेच्या उमेदवारालाही विजयाची शक्यता असल्याचं बोललं जातंय. मात्र शेवटी बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांची उत्सुकता लागली आहे.

विक्रोळीत मतदार किती?: विक्रोळी विधानसभा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या 2 लाख 41 हजार 114 आहे. यामध्ये पुरुष मतदार 53 टक्के आहेत. तर स्त्री मतदार हे 47 टक्के आहेत.

2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
सुनील राऊत शिवसेना 62,794
धनंजय पिसाळे राष्ट्रवादी काँग्रेस 34,953
विनोद शिंदे मनसे 16,042
सिद्धार्थ मोकळे वंचित 9,150
2014 विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
सुनील राऊत शिवसेना 50,302
मंगेश सांगळे मनसे 24,963
संजय दीना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 20,233
डॉ. सांडेश म्हात्रे काँग्रेस 18,046
विवेक पंडित आरपीआय (आठवले) 6,975
2009 विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
मंगेश सांगळे मनसे 53,125
पल्लवी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 32,713
दत्ताराम दळवी शिवसेना 28,129
विनोद कांबळी अपक्ष 3,861

ABOUT THE AUTHOR

...view details