नागपूर : महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. दुपारच्या सुमारास नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा होईल. 21 डिसेंबर 1991 साली उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. तेव्हा छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर वसुधा देशमुख, राजेंद्र गोडे, भरत बाहेकार, शंकर नम, जयदत्त क्षीरसागर आणि शालिनी बोरसे या 6 उपमंत्र्यांनी (राज्य मंत्री नाही) शपथ घेतली होती.
काय घडलं होतं 1991 मध्ये? :1 डिसेंबर 1991 साली झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना छगन भुजबळ त्यांच्या 11 सहकारी आमदारांसह शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते. तेव्हा भुजबळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल, अशी चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी सुधाकरराव नाईक 19 डिसेंबरच्या रात्री उशिरा नागपुरातून हिवाळी अधिवेशन सोडून दिल्लीला गेले होते. 20 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतून ते थेट मुंबईला परतले आले. 20 डिसेंबरच्या दुपारी सुधाकरराव नाईक यांनी तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना नव्या मंत्र्यांची यादी मुंबईत सोपवली होती. त्यानंतर 20 डिसेंबरच्या रात्री उशिरा सुधाकरराव नाईक यांनी नागपुरात येऊन आपण छगन भुजबळ आणि काही उपमंत्र्यांना मंत्रिमंडळात घेत आहोत, असं पत्रकारांसमोर जाहीर केलं होतं.
सरकारचं मंत्रिमंडळ त्रिस्तरीय : दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 21 डिसेंबरला तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम हे तातडीनं मुंबईवरून नागपूरला आले होते. दिवसभर अधिवेशनाचं कामकाज चालल्यानंतर संध्याकाळी अधिवेशन संपल्यानंतर साडेचार वाजता नागपुरातील राजभवनात 1 कॅबिनेट मंत्री आणि 6 उपमंत्र्यांना शपथ दिली गेली होती. त्या मंत्रिमंडळ विस्तारामुळं तेव्हाचे सुधाकरराव नाईक यांच्या सरकारचं मंत्रिमंडळ त्रिस्तरीय (कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री) झालं होतं.