मुंबई -मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खटाटोप सुरू असून, याच कारणास्तव ते मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचं सातत्याने म्हटलं जात होतं. तर त्यांची तब्येत बरी नसून त्यांना घशाचा संसर्ग झाल्याचं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलंय. परंतु अजित पवारांचं नॉट रिचेबल असण्यामागे मंत्रिमंडळातील खातेवाटप अथवा घशाचा संसर्ग हे जरी कारण असलं तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने भुजबळांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी असल्याचं म्हटलं जातंय. भुजबळांच्या मुद्द्यांवरून अजित पवारांची कोंडी झाली असून, याप्रकरणी माध्यमांना तसेच मित्र पक्षांना काय उत्तर द्यावं? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
अजित पवारांवर भुजबळांचे शाब्दिक हल्ले : देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण 42 मंत्र्यांची वर्णी लागली असून, या जम्बो मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने याबाबत भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत थेट अजित पवारांना यासाठी जबाबदार ठरवलंय. माझ्यासारख्या बहुजन नेत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कधीच विरोध नव्हता. उलट माझ्या मंत्रिपदासाठी ते आग्रही होते, असं भुजबळ यांनी सांगत मंत्रिमंडळातून त्यांच्या गच्छंतीसाठी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. मागील दोन दिवसांपासून छगन भुजबळ हे वारंवार या मुद्द्यावर अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले करीत आहेत. त्याचबरोबर पक्षात फक्त अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांचं ऐकलं जातं, बाकी नेत्यांना कोणी विचारत नाही, असा आरोपसुद्धा छगन भुजबळ यांनी केलाय.
भुजबळ यांच्याकडे भविष्यात अनेक पर्याय : रविवार 15 डिसेंबर रोजी सायंकाळी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय आणि दुसऱ्या दिवशी सोमवार 16 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. यंदाच्या मंत्रिमंडळातून माजी 12 मंत्र्यांना महायुती सरकारने नाकारलंय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वात मोठं नाव हे छगन भुजबळांचं आहे. अजित पवार हे छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच काय तर एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही नव्हती, असं जरी म्हटलं गेलं असलं तरी ती शक्यता फार कमी वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांनाही वगळण्यात आलंय. परंतु छगन भुजबळांचा पत्ता कट करणे हे अजित पवार यांना येत्या दिवसांत भारी पडू शकतं, असे संकेत स्वतः छगन भुजबळ यांनी दिलेत. नाराज छगन भुजबळ हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरावरून थेट नाशिकला रवाना झालेत. भुजबळ यांच्याकडे भविष्यात अनेक पर्याय खुले असले तरीसुद्धा अजित पवारांनी भुजबळांना दिलेल्या दगाफटक्याचा हिशेब ते चुकता करण्याच्या तयारीत असल्याचं एकंदरीत त्यांच्या वागणुकीवरून दिसून येतंय. तर दुसरीकडे अजित पवारही भुजबळांच्या पुढील भूमिकेसाठी वेट अँड वॉचच्या प्रतीक्षेत आहेत.
अजित पवारांनी विचारविनिमय करूनच घेतला निर्णय :भुजबळांच्या मुद्द्यावर राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना असं सांगितलं की, यामध्ये खरी गंमत अशी आहे की, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं जाईल, अशी कल्पना त्यांना यापूर्वीच होती. तब्येतीच्या कारणास्तव ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी स्वतःहून मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे भुजबळ यांना आतापर्यंत पक्षाकडून भरभरून भेटलं आहे. भुजबळांनी त्यांचा मुलगा पंकज भुजबळ याची वर्णी विधान परिषदेवर लावण्यात यशस्वी झाले. भुजबळाचं वय पाहता आता ते 77 वर्षांचे आहेत. म्हणजे पुढील 16 व्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांचं वय 82 वर्षांचं असेल. या कारणाने भुजबळांची ही शेवटची निवडणूक आहे. अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनासुद्धा भुजबळांच्या एकंदरीत राजकीय जीवनाची पूर्ण कल्पना असून, त्यांनी मंत्रिमंडळातून त्यांना वगळल्यानंतर होणाऱ्या शाब्दिक आणि राजकीय हल्ल्याची सुद्धा त्यांना पूर्ण कल्पना असल्याने तशी तयारी करूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचंही जयंत माईणकर म्हणालेत.
हेही वाचा :
- एकनाथ शिंदेंची नवीन ओळख 'लाडका भाऊ' कशामुळं? 'ही' योजना ठरली गेमचेंजर
- लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीनंतर आता एकनाथ शिंदेंचं लक्ष्य पालिका निवडणुकीवर, विजयाची रणनीती काय?