नाशिक Nashik ATS : नाशिकमध्ये महाराष्ट्र एटीएसनं (दहशतवाद विरोधी पथक) मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं (ATS) भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक केली. हुजेफ अब्दुल अजीजशेख असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपीला 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप : दहशतवाद विरोधी पथकानं नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून हुजेफ अब्दुल अजीज शेख याला अटक केली. या व्यक्तीवर आयएसआयएस (ISIS) आणि इंडियन मुजाहिदीन (IM) या दहशतवादी संघटनांचं फंडींग आणि त्यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.
आरोपीच्या घराची झडती घेतली : एटीएसच्या पथकानं आरोपीच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान एटीएसनं एक लॅपटॉप, सात मोबाईल आणि एक पेन ड्राइव्ह हस्तगत केला. आरोपी हुजेफ शेख सीरियातील आयसिसशी संबंधित एका महिलेला पैसे पाठवत असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे.