मुंबई- मुंबईला स्वप्ननगरी अन् मायानगरी म्हटलं जातं. जगातील लोक अनेक स्वप्न घेऊन मुंबईत ती पूर्ण करण्यासाठी येतात. म्हणूनच जगाला मुंबईबद्दल हेवा अन् अप्रूप वाटते. मुंबईतील जी पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाणे आहेत, ती ठिकाणं बघितली तरच मुंबई बघितली, असं मुंबई फिरून आलेल्यांना वाटतं. दरम्यान, आपल्या शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय आहे. या नागरिकशास्त्रात राजकारण आणि समाजकारणाबद्दल शिकवले जाते. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, ते मंत्रालय अनेकांना पाहायची इच्छा असते. पण ती सर्वांचीच इच्छा पूर्ण होत असे नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील मलकापुरातील 'आदर्श विद्यालय' या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांनी थेट विमान सफारी करीत मुंबईतील पर्यटनाचा आणि मंत्रालयातील कामकाजाचा अनुभव घेतला. मंत्रालय पाहिल्यानंतर आणि त्या कामकाजाचा अनुभव घेतल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद मात्र ओसंडून वाहत होता.
मुंबईला येण्यासाठी विमान सफारी : आम्ही मुंबईला येण्याचं अनेक दिवसांपासून नियोजन करीत होतो. अखेर आमचं मुंबईला यायचं निश्चित झालंय. आम्ही पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईला जायचे ठरवले. मुंबईत येण्यासाठी साताऱ्यावरून कोल्हापूर गाठले आणि कोल्हापूरवरून विमानानं थेट मुंबईत आलो. मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले. मुलांचा पहिल्यांदाच विमान प्रवास असल्यामुळे हवेतून कसे विमान उडते आणि हवेतील प्रवास बघून मुलं अगदी हर्षोल्हासित झाली. त्यामुळे आम्ही शिक्षक अन् पहिली ते चौथीपर्यंतची मुलं विमानाने थेट मुंबईत पोहोचलो. मुंबईतील विविध पर्यटन स्थळांना भेट देऊन ती पाहिली. मुलांनी पर्यटन स्थळ पाहण्याचा आनंद लुटला, असं यावेळी शिक्षकांनी सांगितलं.
मुंबईत काय काय पाहिले? : मुंबईत येण्यापूर्वी आम्ही मुंबईतील ज्या ठिकाणांना भेट द्यायची आहे, त्याची एक यादी तयार केली. म्हणजे मंत्रालय, वानखेडे स्टेडियम अशा ठिकाणी रीतसर परवानगी लागत असल्यामुळे परवानगीसाठी आम्ही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला होता. यानंतर प्रवेशाची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही मुंबईला येण्याचे निश्चित केलंय. आम्ही मुंबईला आल्यानंतर अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देत तिथला आनंद लुटला. मुंबई पाहून मुलं खूप खूश झाली. मुंबईत येऊन आम्ही राणीची बाग, सिद्धिविनायक मंदिर, क्रिकेटचे मैदान वानखेडे स्टेडियम, मंत्रालय आदी ठिकाणांना आम्ही भेट दिलीय. ही पर्यटन स्थळं पाहून मुलांना त्यातून खूप काही शिकता आलंय. ही ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली आणि मुलांना एका वेगळ्या जगाची अनुभूती घेता आली, असेही यावेळी शिक्षकांनी सांगितलंय.
मंत्रालय पाहून मुलं खूश झाली : दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र विषयामध्ये सामाजिक आणि राजकारण हे शिकवले जाते. यात सरकार कसे चालवले जाते? सरकार म्हणजे काय? आमदार कोणाला म्हणतात? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयात कुठे बसतात? आदीबाबत अभ्यासक्रमात शिकवले जाते. दरम्यान, मंत्रालयातील परवानगीसाठी आम्ही पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर आज पहिली ते चौथी आणि आम्ही शिक्षक मंत्रालय कसे असते हे पाहिले. मंत्रालयातील सहावा माळा, सातवा माळा पाहिला. मुख्यमंत्र्यांचं दालन, त्यांची केबिन, उपमुख्यमंत्र्यांची केबिन पाहिली, मंत्र्याचे सचिव आणि स्वीय सहाय्यक यांच्याशी चर्चा केली. मंत्रालयात कामकाज कसे चालते? याबाबत मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना स्वीय सहायक आणि अधिकारी यांनाही आनंद आलाय. तसेच मुलांनी मंत्रालयातील विविध विभागात काम कसे चालते? हे पाहिले. मंत्रालयातील विविध विभाग फिरून पाहिलंय. गावाकडील लोकांना मंत्रालयाबाबत अप्रूप असते. पण प्रत्येकालाच मंत्रालयात येणे शक्य होत नाही. पण आज आम्ही विद्यार्थ्यांना मंत्रालय दाखवलं आणि मंत्रालय पाहून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. आम्ही अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले, मंत्रालय हा आपल्या अभ्यासक्रमातील भाग आहे. त्यामुळे आम्हाला येथे येऊन खूप छान वाटले. भारी वाटले. मज्जा आली, अशा बोलक्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्यात.
हेही वाचा :