मुंबई Rahul Narwekar Email ID Hacked : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापलेलं असताना एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ईमेल आयडी हॅक करून राज्यपाल रमेश बैस यांना ईमेल पाठवलाय. रमेश बैस यांना सोमवारी (4 मार्च) प्राप्त झालेल्या या ईमेलमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात अनुचित वर्तन केल्याबद्दल काही आमदारांवर कारवाई करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
ईमेल प्राप्त झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी त्याची सत्यता पडताळण्यासाठी तातडीनं राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, नार्वेकर यांनी असं कोणतंही पत्र ईमेलद्वारे पाठविले नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आपल्या ईमेलमध्ये काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात येताच नार्वेकर यांनी तातडीनं मरिन ड्राईव्ह पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल : परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हॅकरविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 डी, 66 सी आणि भारतीय दंड संहिता कलम 419 आणि 170 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान नुकत्याच झालेल्या वादाचा संदर्भ देत फसव्या ईमेलमध्ये आमदार दादा भुसे यांना विशेष लक्ष्य करण्यात आलं होतं. ही घटना उच्च-प्रोफाइल अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण करत आहे. सध्या सुरू असलेल्या तपासाचा उद्देश गुन्हेगाराचा शोध घेणं आणि राहुल नार्वेकरांची ईमेल आयडी सुरक्षा अबाधित ठेवणं हा आहे.
अधिक तपास सुरू :काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसंच 11 निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या केल्याचं प्रकरण देखील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करून राज्यपालांना मेल केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात मुंबई पोलिसांत दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
- वरळी कुणाचाही बालेकिल्ला नाही, राहुल नार्वेकर यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- शरद पवार गटासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उच्च न्यायालयाची नोटीस
- चारित्र्यसंपन्न व्यक्तित्व घडण्यासाठी शिक्षण घेतलं तरच भारत विश्वगुरू होईल-रमेश बैस