मुंबई -23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आलेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विधानसभेच्या एकूण 288 पैकी तब्बल 132 जागा जिंकत एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केलीय. तर, महायुतीला तब्बल 230 जागांवर विजय मिळालाय. विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच आता महाविकास आघाडी विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत.
अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत: राज्यातील महापालिका, पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ साधारण 2021 मध्ये संपला. त्यानंतर आता तीन वर्षे उलटली तरी अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या चर्चा सुरू असतानाच तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील 3 वर्षांपासून प्रशासक कारभार पाहत आहेत. अशातच या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 46 जागा आल्याने आघाडीला घटक पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात:महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या हवाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जाव्यात, असं मत व्यक्त केलंय. "शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झालेला नाही. हा एका विचाराने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे या पुढील काळात पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या काही उमेदवारांचंदेखील हेच मत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी पक्षातील एका मोठ्या वर्गाची भावना आहे," अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीय. यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातदेखील स्वबळाच्या चर्चांना सुरुवात झाल्याचं म्हटलं जातंय.