महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; तर शरद पवारांची अजित पवार आणि भाजपाशी लढत रंगणार

अनेक वर्षांपासून एकेकाळचे मित्रपक्ष असलेले उद्धव सेना विरुद्ध भाजपा असा सामना राज्यात ३४ मतदारसंघांत होणार आहे. तर शरद पवार गटाविरोधात भाजपा ३८ मतदारसंघांत भिडणार आहे.

Uddhav Thackeray vs Shinde Sena in the state
राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे सेना (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2024, 4:40 PM IST

मुंबई -20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी राज्यातील लढतींचं एकूण चित्र स्पष्ट झालं असून, यामध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या असताना उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला भाजपाशीही दोन हात करावे लागणार आहेत. अनेक वर्षांपासून एकेकाळचे मित्रपक्ष असलेले उद्धव सेना विरुद्ध भाजपा असा सामना राज्यात ३४ मतदारसंघांत होणार आहे. तर शरद पवार गटाविरोधात भाजपा ३८ मतदारसंघांत भिडणार आहे. राजकीय पक्षांची वाढलेली संख्या पाहता कधी नव्हे इतकी रंगतदार लढत यंदा होणार असून, याबाबत ओपिनियन पोलचा अंदाजही कितपत खरा ठरणार? यावरही प्रश्नचिन्ह आहे.

बंडखोरांच्या लढती निर्णायक: राज्यात तब्बल १५७ बंडखोरांनी निवडणुकीच्या रिंगणात आपली हजेरी लावली असल्याने जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणलेत. उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी पक्षांतर केले असून, उद्धव सेना पुन्हा आपली शिवसेना मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे राजकारणाची नस ओळखणारे जाणते राजे शरद पवार हे राज्यात करिश्मा करण्याच्या तयारीत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत हा मुकाबला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रंगणार असला तरी बंडखोर उमेदवारांच्या लढती निर्णायक ठरणार आहेत.

४६ जागी उद्धवसेना विरुद्ध शिंदे सेना:राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४६ ठिकाणी उद्धवसेना विरुद्ध शिंदे सेना असा सामना रंगणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, वैजापूर, कन्नड,पैठण, सिल्लोड,उस्मानाबाद, परभणी, उमरगा, कळमतुरी या दहा मतदारसंघाचा समावेश आहे. मराठवाड्यात एकूण ४६ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी १० जागांवर दोन्ही सेनेत मुकाबला होत आहे. विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा असून यामध्ये रामटेक, बालापुर, दर्यापूर, मेहकर, बुलढाणा अशा पाच ठिकाणी दोन सेनेत लढत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण ६६ जागा असून ८ जागांवर शिंदे सेना विरुद्ध उद्धव ठाकरे सेना अशी लढत होणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण ४७ जागा असून, नेवसा, पाचोरा, चोपडा, मालेगाव बाह्य या ठिकाणी दोन्ही सेनेत लढत होणार आहे.

मुंबईसह कोकणात रंगतदार लढती : मुंबई, ठाण्यासह कोकणात एकूण ६७ जागा असून, भायखळा, वरळी, चेंबूर, भांडुप पश्चिम, कुर्ला, विक्रोळी, अंधेरी पूर्व, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, मागाठणे, ठाणे, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, पालघर, बोईसर, कर्जत, महाड या ठिकाणी दोन्ही सेना आपसात भिडणार आहेत.

अशा होत आहेत लढती :राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजपाचा जवळपास ७६ मतदारसंघांत तर शरद पवार गट विरुद्ध भाजपा ३८ मतदारसंघांत आणि उद्धवसेना विरुद्ध भाजपा ३४ मतदारसंघांत मुकाबला होत आहे. तर दुसरीकडे ३७ मतदारसंघांमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट, १९ मतदारसंघांमध्ये काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना, ९ मतदारसंघांत शरद पवार गटविरुद्ध शिंदे सेना, ७ मतदारसंघांत काँग्रेस विरुद्ध अजित पवार गट आणि ६ मतदारसंघांत उद्धवसेना विरुद्ध अजित पवार गट असा सामना होत आहे.

दोन शिवसेनेत होणाऱ्या महत्त्वाच्या लढती

कुडाळ
वैभव नाईक (उबाठा) विरुद्ध निलेश राणे (शिंदे सेना)

सावंतवाडी
राजन तेली (उबाठा) विरुद्ध दीपक केसरकर (शिंदे सेना)

रत्नागिरी
बाळ माने (उबाठा) विरुद्ध उदय सामंत (शिंदे सेना)

गुहागर
भास्कर जाधव (उबाठा) विरुद्ध राजेश बेंडल (शिंदे सेना)

दापोली
संजय कदम (उबाठा) विरुद्ध योगेश कदम (शिंदे सेना)

महाड
स्नेहल जगताप (उबाठा) विरुद्ध भरत गोगावले (शिंदे सेना)

कर्जत
नितीन सावंत (उबाठा) विरुद्ध महेंद्र थोरवे (शिंदे सेना)

कोपरी- पाचपाखाडी
केदार दिघे (उबाठा) विरुद्ध एकनाथ शिंदे (शिंदे गट)

ओवळा - माजिवडा
नरेश मणेरा (उबाठा) विरुद्ध प्रताप सरनाईक (शिंदे गट)

भिवंडी ग्रामीण
महादेव घाटाळ (उबाठा) विरुद्ध शांताराम मोरे (शिंदे सेना)

कल्याण पश्चिम
सचिन बासरे (उबाठा) विरुद्ध विश्वनाथ भोईर (शिंदे सेना)

अंबरनाथ
राजेश वानखेडे (उबाठा) विरुद्ध बालाजी किणीकर (शिंदे सेना)

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणूक 2024 : महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 'इतके' दिवस ठोकणार तळ
  2. विधानसभा निवडणूक 2024 : पृथ्वीराज चव्हाणांच्या मैदानात अमित शाह करणार 'बॅटींग'; अरविंद केजरीवाल देणार उत्तर?

ABOUT THE AUTHOR

...view details