महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट, म्हणाले... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रि‍पदावरचा दावा सोडल्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी भावनिक पोस्ट लिहिलीय.

Shrikant Shinde and Eknath Shinde
श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 12:48 PM IST

मुंबई- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. शपथविधी सोहळ्यात काही मान्यवर अन् धार्मिक नेत्यांचा समावेश होणार असल्याचंही बोललं जातंय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे एकनाथ शिंदे हे शर्यतीतून बाहेर पडल्याचं त्यांनी जाहीर केलंय. स्वतः पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेच्या तयारीत असतानाच एकनाथ शिंदे यांनी आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांना नव्यानं स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे, अशी विनंती केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' : विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रि‍पदावरचा दावा सोडल्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी भावनिक पोस्ट लिहिलीय. ते लिहितात, "मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला", असंही ते म्हणालेत.

...पण शिंदे साहेब अपवाद ठरले :कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय अमित शाहजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवल्याचंही श्रीकांत शिंदेंनी अधोरेखित केलंय. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर-गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी वडिलांबद्दलच्या त्यांच्या भावना बोलून दाखवल्यात.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदे सरकारमध्ये नसणार? :तर दुसरीकडे महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्री निवडीबाबत महायुतीत निर्णय घेण्यास विलंब होत असल्यानं विरोधकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जातीय समीकरणांमुळे एनडीएच्या मित्रपक्षांना सोबत घेण्याचा भाजपाच्या मोदी आणि शाहांचा प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिलाय.

हेही वाचा-

  1. मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडल्याचे एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट संकेत, मोदी-शाह जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचं पूर्णपणे समर्थन
  2. दिल्लीश्वरांच्या वटारलेल्या डोळ्यांना बंडखोर घाबरत नाहीत-संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details