पुणे -बारामतीत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असून, राज्याचं नव्हे तर देशाचं त्याकडे लक्ष लागलंय. शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर बूथमध्ये अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात असल्याचा आरोप युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केलाय. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रया देत शर्मिला पवार धादांत खोटे बोलत असल्याचा पलटवार अजित पवारांनी केलाय.
बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतणे : राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागले असून, बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतणे अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. अशातच आज दुपारी मतदान प्रक्रिया पार पडत असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केल्याचं आरोप करण्यात आलाय. त्यानंतर या सर्व प्रकारावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
आम्ही सुसंस्कृत फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात : अजित पवार म्हणाले की, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील, काय खरे अन् काय खोटे आहे ते पाहतील. या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, ते निवडणूक अधिकारी तपासतील. आम्ही अनेक निवडणुका या ठिकाणी पार पाडल्यात, अशा पद्धतीचं आमच्या कार्यकर्त्यांनी कधी वक्तव्य केलेलं नाही. आम्ही सुसंस्कृत फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असून, माझा आमच्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे, असंही अजित पवारांनी सांगितलंय. तक्रार कोणीही करेल, पण मात्र त्यात जे कोणी असेल तर कारवाई होईल उलट माझ्याच कार्यकर्त्याला बॉलिंग एजंटला मतदान केंद्रातून बाहेर काढले हा अधिकार त्यांना नसून तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलंय.